मुंबई: महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र होताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्यावर महाराष्ट्र काँग्रेसने अत्यंत आक्रमक आणि जहरी शब्दात टीका केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरील एका विस्तृत पोस्टमधून काँग्रेसने शिंदेंच्या राजकारणावर, त्यांच्या भाजपसोबतच्या युतीवर आणि त्यांच्या नेतृत्वशैलीवर थेट निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
"आधी बाळासाहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना उभी करा"
काँग्रेसने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची काँग्रेस होईल का याची चिंता करण्याऐवजी आधी बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेली शिवसेना उभी करून दाखवावी. काँग्रेसने असा आरोप केला की, शिवसेना आणि तिच्या विचारसरणीबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार शिंदे यांनी गमावला आहे.
हे ही वाचा>> 'शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही..' वर्धापन दिनानिमित्त शिंदेसेनेचा खास टीझर बघितला का?
काँग्रेसच्या इतिहासाचा दाखला
पोस्टमध्ये काँग्रेसने आपल्या ऐतिहासिक वारशाचाही उल्लेख केला आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीतील भूमिका आणि महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांसारख्या नेत्यांचा वारसा काँग्रेसकडे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
काँग्रेसने असा दावा केला की, "काँग्रेस होण्यासाठी त्याग, संघर्ष आणि देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची परंपरा लागते. कोणताही भेदभाव न करता माणसाला माणसाशी जोडणारे राजकारण करण्याची क्षमता लागते."
हे ही वाचा>> ठाकरेंची साथ सोडल्यानंतर ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया, पक्षांतराची कारणे सांगितली!
या माध्यमातून काँग्रेसने स्वतःच्या वैचारिक परंपरेचा दाखला देत शिंदेंच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपची 'बी-टीम' असल्याचा आरोप
काँग्रेसच्या पोस्टमधील सर्वात तीव्र आरोप म्हणजे शिंदे हे भाजपची 'बी-टीम' बनल्याचा दावा. काँग्रेसने म्हटले की, सत्तेच्या मोहापोटी आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या भीतीमुळे शिंदे यांनी दिल्लीसमोर शरणागती पत्करली आहे.
पोस्टमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून शिंदे गटाने स्वतंत्र राजकीय भूमिका सोडली असून आज त्यांच्याकडे कोणतीही स्पष्ट विचारसरणी उरलेली नाही.
कायदा-सुव्यवस्था आणि पक्षातील नेत्यांवरही निशाणा
काँग्रेसने राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि शिंदे गटातील काही नेत्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक, वसुली आणि टक्केवारीच्या राजकारणाशी संबंधित घटक पक्षात एकत्र केल्याचा आरोप पोस्टमधून करण्यात आला आहे.
तसेच, "दिल्लीहून आदेश आले की उठायचे आणि बसायचे, एवढीच तुमची भूमिका उरली आहे," अशा शब्दांत काँग्रेसने शिंदेंच्या स्वायत्ततेवरही प्रश्न उपस्थित केला आहे.
"वाघ बना, म्याँव-म्याँव करू नका"
या संपूर्ण पोस्टमधील सर्वाधिक चर्चेचा भाग म्हणजे शेवटचा टोला. काँग्रेसने म्हटले आहे की, "दिल्लीचे आदेश पाळणारे लाचार बनण्यापेक्षा आधी बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेला 'वाघ' बनून दाखवा. उगीच म्याँव-म्याँव करून वाघ असल्याचा आव आणू नका."
दरम्यान, या टीकेला शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर दिले जाते आणि हा वाद पुढे कोणते राजकीय वळण घेतो, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT











