Omraje Nimbalkar On Pawanraje Murder Verdict : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा तब्बल 20 वर्षांनंतर निकाल लागला असून, न्यायालयाने या प्रकरणातील मुख्य आरोपी पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 8 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. या दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर आलेला हा निकाल खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी अत्यंत मोठा धक्का मानला जात आहे. या निकालानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी हा निकाल अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
उच्च न्यायालयात जाणार
निकालानंतर एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना ओमराजे निंबाळकर म्हणाले की, 'माननीय कोर्टाने जो निकाल दिलेल्या निकालावर बोलण्यापेक्षा उच्च न्यायालयात अपील करणं आणि उच्च न्यायालयासला पटवून देणं महत्त्वाचं आहे. कोर्टाचा निकाल प्रत्येकाला स्वीकारावाच लागतो. पण आम्ही उच्च न्यायालयात अपील करणार आहोत. कोर्टाच्या शेवटच्या उपायापर्यंत (remedy) आम्ही संघर्ष करणार आहोत. हा निकाल धक्कादायक आहे.'
उच्च न्यायालयात कोणते पुरावे देणार याविषयी बोलताना ते म्हणाले की, 'ट्रायल कोर्टात जे पुरावे आहेत तेच उच्च न्यायालयात समोर येतील. याबाबतीत कायदेशीर बाबींवर जो काही उहापोह करायचा तो उच्च न्यायालय करेल.'
हे ही वाचा : मोठी बातमी! पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला, पद्मसिंह पाटील...
मुंबई पोलिसांवर दबाव
यापुढं बोलताना ते म्हणाले की, 'पहिल्यांदा या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते. त्यांच्यावर प्रचंड दबाव होता. यानंतर हा तपास सीआयडीकडे देण्यात आला. त्यांच्यावरही प्रचंड दबाव होता. आणि म्हणून आम्ही 2008 मध्ये उच्च न्यायालयात अपील दाखल केलं होतं. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ही केस सीबीआयकडे वर्ग झाली होती. त्यानंतर सीबीआयने तपास केला होता. सुरुवातीच्या तपास यंत्रणा मॅनेज होत्या ही वस्तुस्थिती होती. म्हणून तर सीबीआयकडे केस द्यावी म्हणून अपील केलं होतं.'
हे ही वाचा : ओमराजे कोर्टाबाहेर आले, ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक, नेमकं काय घडलं?
कलयुगात वाईटाला बळ
सीबीआयवर देखील कोर्टानं ताशेरे ओढलेले आहेत याविषयी बोलताना ओमराजे म्हणाले की, 'याबाबतीत आता आम्ही उच्च न्यायालयात दाद मागू.' यापुढं बोलताना ते म्हणाले की, 'कलयुगात वाईटाला जास्त बळ असतं, चांगल्याला लवकर यश मिळत नाही.'
हे ही वाचा : पवनराजे निंबाळकर हत्याकांड, आरोपींनी आधीच भोगला आहे 'इतका' तुरुंगवास, आज काय होणार?
शिंदे गटात जाणार का?
एकनाथ शिंदे गटात सामील होण्याविषयी या निकालानंतर निर्णय घेणार असल्याचं ओमराजे म्हणाले होते. याविषयी विचारले असता ते म्हणाले की, 'मी माझ्या मतदारंघात जाईन आणि सर्वांशी चर्चा करुन निर्णय घेईन. या केसच्या निर्णयाचा आणि माझ्या निर्णयाचा काही संबंध नाही. मला मतदारसंघातील लोकांशी चर्चा करुन त्यांच्या भावना जाणून घ्यायच्या आहेत.'
ADVERTISEMENT











