ठाकरेंची साथ सोडल्यानंतर ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया, पक्षांतराची कारणे सांगितली!

Om Rajenimbalkar : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचे स्पष्ट संकेत दिले असून, मतदारसंघातील रखडलेली विकासकामे आणि राजकीय अस्तित्वासाठी पक्ष सोडत असल्याचे 'दिव्य मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

Omraje Nimbalkar News

Omraje Nimbalkar News

मुंबई तक

19 Jun 2026 (अपडेटेड: 19 Jun 2026, 12:14 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

ठाकरेंची साथ सोडल्यानंतर ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया

point

पक्षांतराची कारणे सांगितली!

Omraje Nimbalkar, गणेश जाधव : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी 'दिव्य मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका मांडली आहे. समोर सत्ता आणि पैसा असताना आपल्याकडे फक्त निष्ठा उरली आहे, परंतु या निष्ठेच्या जोरावर जर मतदारसंघातील लोकांची कामेच करता येत नसतील, तर लोकांसमोर कोणत्या तोंडाने जायचे, असा  सवाल त्यांनी उपस्थित केला. शेवटी कोरड्या हाताने कधीपर्यंत फिरणार, यामुळे आता आपल्यासमोर दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही, असे स्पष्ट करत त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत. भावनिकदृष्ट्या विचार केल्यास हा निर्णय जरी चुकीचा वाटत असला, तरी राजकीय भविष्याचा विचार करता तो अत्यंत योग्य आणि आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या आपण पुण्यात असून, येत्या 20जून रोजी वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येच्या खटल्याचा निकाल लागल्यानंतर धाराशिवमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे वाचलं का?

हेही वाचा : फॉर्च्युनरमध्ये कोंडून भाजप नेत्यासह तिघांना जिवंत जाळलं, धक्कादायक कारण समोर

'मी सध्या मोठ्या धर्मसंकटात सापडलोय'

शिंदेसेनेत प्रवेश करण्याच्या चालू असलेल्या चर्चांवर बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले की, ते सध्या एका मोठ्या धर्मसंकटात सापडले आहेत. शिंदेसेनेतील प्रवेशाबाबत त्यांच्यावर कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आहे. पक्षांतराच्या मागे मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार किंवा कोट्यावधी रुपये घेतल्याची चर्चा सुरू आहे, परंतु ही चर्चा संपूर्णपणे खोटी, तथ्यहीन आणि बिनबुडाची आहे. राजकारणात आपल्यासाठी सत्ता आणि पैसा नेहमीच गौण राहिले असून, आपण पैशांसाठी हा निर्णय घेत नसून केवळ मतदारसंघातील रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठीच हा पाऊल उचलत आहोत. जर आपल्याला पैशांसाठीच राजकारणात रस असता, तर खूप पूर्वीच पक्षप्रवेश केला असता, असे सांगत त्यांनी 50कोटी आणि 'वाय प्लस' सुरक्षेच्या चर्चा पूर्णपणे फेटाळून लावल्या. आपण एक सामान्य खासदार म्हणून प्रत्येकाचा फोन स्वतः उचलतो आणि लोकांमधेच वावरतो, त्यामुळे आपल्याला कोणत्याही विशेष सुरक्षेची गरज नाही, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.

हेही वाचा : Personal Finance: रिडेव्हलपमेंटमध्ये ‘हे’ असतात घरमालकांचे हक्क, अजिबात घेऊ नका माघार..

'कार्यकर्त्यांना बळ आणि ताकद देणे गरजेचे होते'

महायुतीचे नेते आणि उद्धवसेनेचे नेतृत्व यांच्या कार्यपद्धतीतील मोठा आणि स्पष्ट फरक ओमराजे यांनी या मुलाखतीदरम्यान घट्टपणे मांडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एवढ्या मोठ्या संख्येने आमदार निवडून आलेले असतानाही ते शांत बसलेले नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आणि आता विधान परिषदेच्या निवडणुकीतही ते स्वतः मैदानात उतरून फिरत आहेत. या उलट, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना फिरणे शक्य नाही हे समजू शकते, परंतु किमान युवा नेते आदित्य ठाकरे यांनी तरी संपूर्ण राज्यभर फिरून कार्यकर्त्यांना बळ आणि ताकद देणे गरजेचे होते, परंतु दुर्दैवाने तसे झाले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पक्षनेतृत्वाकडून कार्यकर्त्यांना योग्य ती ताकद न मिळाल्यामुळे पक्षात कमालीची नाराजी असल्याचे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले.

ठाकरे गटात राहून भविष्यात येणाऱ्या अडचणींबद्दल बोलताना त्यांनी आपल्या राजकीय अस्तित्वाबद्दल चिंता व्यक्त केली. खासदार म्हणून आपण लोकांची कामे करण्यासाठी प्रचंड कष्ट आणि प्रयत्न करतो, तरीही नगर परिषद, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये आपली सत्ता का येत नाही, हा यक्षप्रश्न निर्माण होतो. आज जर मतदारसंघात हीच बिकट परिस्थिती राहिली, तर भविष्यात आपल्या स्वतःच्या राजकीय अस्तित्वालाच मोठा धोका निर्माण होईल, अशा वेळी लोकप्रतिनिधी म्हणून हताश बसण्याशिवाय काय करावे, असा प्रश्न त्यांनी केला. मतदारसंघात लोकांना शेतरस्ते आणि पूल हवे आहेत, गावांमध्ये रोहित्र (डीपी) बसवण्यासाठी स्वतः तीन-तीन वेळा प्रस्ताव देऊनही कामे मंजूर होत नाहीत. आपल्याकडे ना निधी असतो, ना कामे करून घेता येतात, यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी आणि राजकीय अस्तित्वासाठी पक्ष सोडण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिला नसल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.