OmRaje nimbalkar on Aaditya Thackeray, गणेश जाधव : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी 'दिव्य मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका मांडली आहे.. सध्या सत्तेची ताकद आणि आर्थिक बळ इतरांकडे असताना आपल्या हातात केवळ निष्ठाच शिल्लक असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, या निष्ठेच्या आधारे मतदारसंघातील नागरिकांची कामेच होत नसतील, तर जनतेसमोर कोणत्या चेहऱ्याने जावे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. किती काळ रिकाम्या हाताने फिरायचे, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने आता आपल्याकडे दुसरा कोणताही मार्ग उरलेला नसल्याचे सांगत त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले. भावनिक दृष्टिकोनातून हा निर्णय चुकीचा वाटू शकतो, मात्र राजकीय भवितव्याच्या दृष्टीने तो आवश्यक आणि योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या ते पुण्यात असून, 20 जून रोजी वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी निकाल लागल्यानंतर धाराशिवमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : ठाकरेंनी उमेदवारी दिल्यास 2029 ची लोकसभा लढणार आहात का? कैलास पाटील म्हणाले...
ओमराजेंनी मुलाखतीत खालील 6 मुद्दे मांडले
"मी सध्या मोठ्या धर्मसंकटात आहे, भावनिकदृष्ट्या विचार केला तर हे पाऊल चुकीचं वाटतं. परंतु राजकीयदृष्ट्या विचार केला तर हेच बरोबर आहे. शिवसेनेतील प्रवेशावरून माझ्यावर कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आहे. मी सध्या पुण्यात आहे, 20 जून रोजी माझ्या वडिलांच्या हत्या प्रकरणाचा निकाल येणार आहे, त्यानंतर मी मतदारसंघात जाणार आहे. त्यावेळी कार्यकर्त्यांसोबत सविस्तर चर्चा केल्यानंतर पुढील निर्णय घेईन", असं निंबाळकरांनी नमूद केलं
'बंडखोरी पैशांसाठी नव्हे, मतदारांसाठी'
"पैसे घेतल्याची चर्चा पूर्णपणे खोटी आणि तथ्यहीन आहे. माझ्यासाठी सत्ता आणि पैसा नेहमीच गौण राहिलेलं आहे. हा निर्णय पैशांसाठी नाही तर मतदारसंघातील विकासकामं आणि अपेक्षेने पाहणाऱ्या मतदारांसाठी घेतलेला आहे", असं स्पष्टीकरणही ओमराजे यांनी दिलं.
हेही वाचा : ठाकरेंची साथ सोडल्यानंतर ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया, पक्षांतराची कारणे सांगितली!
आदित्य ठाकरेंवर ओमराजेंची नाराजी
शिंदे आणि फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतली. विधान परिषदेच्या निवडणुकीतही ते स्वत: फिरत आहेत, प्रकृती ठीक नसल्यामुळे उद्धव ठाकरेंना फिरणं शक्य नाही, हे मी समजू शकतो. परंतु किमान आदित्य ठाकरेंनी फिरायला हवं होतं. कार्यकर्त्यांना ताकद द्यायला पाहिजे होती, दुर्दैवाने ते झालं नाही.
ओमराजे म्हणतात, 'माझ्या आस्तित्वाला धोका'
खासदार म्हणून आम्ही लोकांचे प्रश्न सोडवतो, तरी देखील नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत आमची सत्ता का येत नाही? हा प्रश्न मला पडतो. अशीच स्थिती राहिली तर माझ्या राजकीय आस्तित्वाला धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. अशावेळी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काय करायला हवं?
'निष्ठा आहे, पण लोकांची कामं कशी करायची?'
समोर सत्ता आणि पैसा आहे, माझ्याकडे पक्षाबद्दलची निष्ठा आहे. परंतु निष्ठा असूनही लोकांची कामं करता येत नसतील तर लोकांसमोर मी कसं जायचं? मोकळ्या हाताने मी कधीपर्यंत फिरायचं? त्यामुळे माझ्यासमोर दुसरा पर्याय उरलेला नव्हता.
'प्रत्येकाशी बोलतोय, मला सुरक्षा नको'
मी पैशांसाठी राजकारणात आलो असतो तर यापूर्वीच पक्षप्रवेश केला असता. मी प्रत्येकासोबत फोनवर बोलतो आहे, मला कुठल्याही सुरक्षेची गरज नाहीये.
ADVERTISEMENT











