ठाकरेंची साथ सोडल्यानंतर ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया, पक्षांतराची कारणे सांगितली!
Om Rajenimbalkar : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचे स्पष्ट संकेत दिले असून, मतदारसंघातील रखडलेली विकासकामे आणि राजकीय अस्तित्वासाठी पक्ष सोडत असल्याचे 'दिव्य मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ठाकरेंची साथ सोडल्यानंतर ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया
पक्षांतराची कारणे सांगितली!
Omraje Nimbalkar : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी 'दिव्य मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका मांडली आहे. समोर सत्ता आणि पैसा असताना आपल्याकडे फक्त निष्ठा उरली आहे, परंतु या निष्ठेच्या जोरावर जर मतदारसंघातील लोकांची कामेच करता येत नसतील, तर लोकांसमोर कोणत्या तोंडाने जायचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेवटी कोरड्या हाताने कधीपर्यंत फिरणार, यामुळे आता आपल्यासमोर दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही, असे स्पष्ट करत त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहेत. भावनिकदृष्ट्या विचार केल्यास हा निर्णय जरी चुकीचा वाटत असला, तरी राजकीय भविष्याचा विचार करता तो अत्यंत योग्य आणि आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या आपण पुण्यात असून, येत्या 20जून रोजी वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येच्या खटल्याचा निकाल लागल्यानंतर धाराशिवमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : फॉर्च्युनरमध्ये कोंडून भाजप नेत्यासह तिघांना जिवंत जाळलं, धक्कादायक कारण समोर
'मी सध्या मोठ्या धर्मसंकटात सापडलोय'
शिंदेसेनेत प्रवेश करण्याच्या चालू असलेल्या चर्चांवर बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले की, ते सध्या एका मोठ्या धर्मसंकटात सापडले आहेत. शिंदेसेनेतील प्रवेशाबाबत त्यांच्यावर कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आहे. पक्षांतराच्या मागे मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार किंवा कोट्यावधी रुपये घेतल्याची चर्चा सुरू आहे, परंतु ही चर्चा संपूर्णपणे खोटी, तथ्यहीन आणि बिनबुडाची आहे. राजकारणात आपल्यासाठी सत्ता आणि पैसा नेहमीच गौण राहिले असून, आपण पैशांसाठी हा निर्णय घेत नसून केवळ मतदारसंघातील रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठीच हा पाऊल उचलत आहोत. जर आपल्याला पैशांसाठीच राजकारणात रस असता, तर खूप पूर्वीच पक्षप्रवेश केला असता, असे सांगत त्यांनी 50कोटी आणि 'वाय प्लस' सुरक्षेच्या चर्चा पूर्णपणे फेटाळून लावल्या. आपण एक सामान्य खासदार म्हणून प्रत्येकाचा फोन स्वतः उचलतो आणि लोकांमधेच वावरतो, त्यामुळे आपल्याला कोणत्याही विशेष सुरक्षेची गरज नाही, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
हेही वाचा : Personal Finance: रिडेव्हलपमेंटमध्ये ‘हे’ असतात घरमालकांचे हक्क, अजिबात घेऊ नका माघार..









