'मी माझा निर्णय दोन दिवसांनी...' शिंदेंची धाकधूक वाढवली?, आता सगळा गेम ओमराजे निंबाळकरच्या हातात!

शिवसेना UBT पक्षाचे 6 खासदार फुटले असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज (20 जून) केलेल्या एका विधानाने शिंदे गटाची चिंता वाढली आहे.

i take my decision in 2 days shiv sena ubt mp omraje nimbalkar has heightened anxiety of shinde led shiv sena

ओमराजे निंबाळकर (फाइल फोटो)

मुंबई तक

• 05:36 PM • 20 Jun 2026

follow google news

मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील कथित फुटीच्या चर्चांदरम्यान धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी आज (20 जून) दिलेल्या प्रतिक्रियेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून ओमराजे निंबाळकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा जोरात सुरू असताना त्यांनी प्रथमच माध्यमांसमोर ऑपरेशन टायगरबाबत भूमिका मांडली आहे.

हे वाचलं का?

ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "मी उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेंबाबत काहीही बोललेलो नाही. माझी भूमिका काहीही असली तरी मी उद्धवजी आणि आदित्यजींबद्दल आधीही कधी बोललो नाही, आताही बोलणार नाही आणि भविष्यातही बोलणार नाही."

त्यांच्या या विधानामुळे त्यांनी अद्याप ठाकरे कुटुंबाशी असलेले राजकीय आणि वैयक्तिक संबंध कायम असल्याचे संकेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

'दोन दिवसांनी घेणार निर्णय', ओमराजेंच्या मनात नेमकं काय?

सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या राजकीय भवितव्याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नसल्याचा दावा केला आहे.

हे ही वाचा>> ओमराजे कोर्टाबाहेर आले, ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक, नेमकं काय घडलं?

त्यांनी म्हटले की, "मी माझ्या लोकांसोबत चर्चा करून, माझ्या मतदारसंघातील कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधून काय करायचं ते ठरवेन. दोन दिवसांनंतर मी माझा निर्णय जाहीर करेन." त्यांच्या या विधानामुळे शिंदे गटात प्रवेश निश्चित झाल्याच्या चर्चांना काही प्रमाणात ब्रेक लागल्याचे मानले जात आहे.

संजय राऊतांच्या आरोपांनाही दिले उत्तर

दरम्यान, शिवसेना (UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ओमराजे निंबाळकरांवर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या वडिलांच्या प्रकरणातील निकालाशी संबंधित काही 'डील' झाल्यामुळे त्यांनी भूमिका बदलल्याचा दावा राऊत यांनी केला होता.

हे ही वाचा>> ऑपरेशन टायगरनंतर.. आणखी मोठा भूकंप घडवणार शिंदे? स्टेजवरून स्वत:च दिली मोठी हिंट

यावर प्रतिक्रिया देताना ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्टपणे म्हटले की, "2022 ला पण शिवसेना फुटली होती. तेव्हा पण मला जाता आलं असतं. मग निकालाचा काय संबंध?" या एका वाक्यातून त्यांनी राऊतांचे आरोप फेटाळून लावण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.

शिंदे गटाची धाकधूक वाढली?

गेल्या काही दिवसांपासून "ऑपरेशन टायगर" अंतर्गत उद्धव ठाकरे गटातील काही खासदार आणि नेते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यात ओमराजे निंबाळकर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत होते.

मात्र, त्यांनी थेट प्रवेशाची घोषणा न करता निर्णयासाठी आणखी वेळ मागितल्याने शिंदे गटाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर ऐनवेळी ओमराजे निंबाळकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय बदलला तर त्याचा मोठा फटका हा शिंदेंना तर बसेलच मात्र, इतर 5 खासदारांच्या राजकीय भवितव्याचा देखील प्रश्न निर्माण होऊ शकतो.

2024 लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे मशाल चिन्हावर 9 खासदार निवडून आलेले. अशावेळी ऑपरेशन टायगर यशस्वी करण्यासाठी शिंदेंना ठाकरेंच्या 6 खासदारांची गरज आहे. कारण 2/3 खासदार फुटले तरच त्यांची खासदारकी कायम राहील. मात्र, जर यापैकी एकाही खासदाराने माघार घेतली तर उरलेल्या 5 जणांवर ठाकरेंची शिवसेना कारवाई करू शकते.

अशातच आज ओमराजेंनी हे स्पष्ट केलं की, त्यांनी अद्याप तरी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे जर ते शिंदेंकडे जाण्याऐवजी ठाकरेंकडेच राहिले तर हा शिंदे गटाला मोठा धक्का बसू शकतो. त्यामुळेच आता शिंदेंच्या शिवसेनेची धाकधूक वाढली असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्टपणे कोणत्याही बाजूने भूमिका घेतलेली नसली तरी त्यांनी निर्णय लवकरच जाहीर करणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता केवळ धाराशिवच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष त्यांच्या पुढील घोषणेकडे लागले आहे.

शिवसेनेतील सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये ओमराजे निंबाळकर यांचा निर्णय हा ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांसाठीही अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यांच्या एका निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढील समीकरणांवर मोठा परिणाम होऊ शकतो.