पूजा सोनावणे, बीड: 'भगवानगडावर राजकारण करायचं नाही...' असं कधी काळी पंकजा मुंडेंना म्हणालेल्या नामदेव शास्त्रींनी त्याच भगवान गडावरुन धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यामुळे एक नाव वाद सुरु झाला आहे. संतोष देशमुख प्रकरणामुळं राजीनाम्याची मागणी होत असलेले मंत्री धनंजय मुंडे भगवनगडावर जातात, तिथे महंत नामदेशास्त्रींची भेट घेतात, त्यांनंतर नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची उघडपणे घेतलेली बाजू आता त्यांच्या चर्चांच्या केंद्रस्थानी येण्याचं कारणं बनली आहे. नामदेव शास्त्री चर्चेत येण्याचं हे काही पहिलं कारण नाही, याआधी ते कोणत्या कारणांमुळं चर्चेत आले, ते नेमके कोण आहे, त्यांचे विदेशातील फोटो सोशल मीडियावर का व्हायरल होतात? जाणून घेऊया नामदेव शास्त्रींचा सगळा इतिहास.
ADVERTISEMENT
कोण आहेत नामदेव शास्त्री आणि काय आहे त्यांचा नेमका इतिहास...
30 जानेवारीला मंत्री धनंजय मुंडेंनी भगवानगडावर महंत नामदेव शास्त्रींची भेट घेतली. धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत नामदेव शास्त्री म्हणाले, 'धनंजय मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही. धनंजय मुंडेंची पार्श्वभूमी तशी नाही. भगवानगड धनंजय मुंडे यांच्या भक्कम पाठीशी आहे.' यानंतर काय एकच वाद सुरु झाला. सोशल मीडियावर नामदेव शास्त्री महाराजांवर टीकेची झोड उठवली गेली.
हे ही वाचा>> नामदेव शास्त्रींना चिंता संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांच्या मानसिकतेची, म्हणाले अगोदर 'त्यांना' मारहाण...
जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले, 'भगवान गडासारख्या पवित्र ठिकाणावरुन अशा गुन्हेगारी वृत्तीचे समर्थन आणि पाठराखण होणे, ही समाजासाठी अत्यंत घातक गोष्ट आहे. कधीकाळी आपण भगवानगड राजकारण्यापासून मुक्त करण्याची शपथ घेतली होती? आणि आज निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करुन त्यांचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या धंनजय मुंडे, वाल्मिक कराड टोळीचे समर्थन करताय? ही मनाला न पटणारी गोष्ट आहे'
यानंतर काल म्हणजेच 2 फेब्रुवारीला नामदेव शास्त्रींना संतोष देशमुखांचं कुटुंबीय सुद्धा भेटायला गेलं, 'तेव्हा भगवान गड तुमच्या पाठी कायम राहील..' ही ग्वाही नामदेव शास्त्रींनी त्यांना दिली.
हे सगळं एका बाजूला जरी घडत असलं तरी आता नामदेव शास्त्री नेमके कोण आहेत, त्यांचा इतिहास काय सांगते हे जाणून घेणं देखील तितकचं महत्वाचं आहे. त्यामुळे आता आपण मुळ मुद्द्यावर येऊया.
नामदेव शास्त्री... अहिल्यानगरच्या पाथर्डी येथील भगवान गडाचे महंत. भगवानगड हा वंजारी समाजाचं श्रद्धास्थान मानला जातो. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी भगवानगडावर फक्त मराठवाडाच नाही तर राज्यभरातून भाविकांची गर्दी होते. भगवानबाबांच्या निधनानंतर महंत भीमसिंह महाराज यांना गादीवर बसवण्यात आलं, भीमसिंह महाराजांनतर महंत नामदेव शास्त्री महाराज या गादीवर नियुक्ती करण्यात आली.
हे ही वाचा>> धनंजय मुंडेंवरचा 'तो' प्रश्न अन् नामदेव शास्त्री मुंबई Tak च्या LIVE शोमधून उठून गेले!
नामदेव शास्त्रींनी न्यायाचार्य या पदवीसाठी मुंबई, आळंदी येथे शिक्षण घेऊन एम. ए. पदवी प्राप्त केली. त्यानंतर पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी भगवानगडाची गादी सांभाळली, सर्वच पक्षातील मोठ्या नेत्यांशी त्यांचे चांगले संपर्क असल्याचं बोललं जातं. 2016 साली पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यात झालेला मोठा संघर्ष आजही चर्चेचा विषय आहे. भगवानगडावरुन राजकीय भाष्य नको असं म्हणत नामदेव शास्त्रींनी त्यावेळी पंकजा मुंडेंच्या मेळाव्याला विरोध केला होता.
शेवटी पंकजा मुंडेंना भगवानगडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घ्यायला लागला होता. 2017 ला पंकजा मुंडेंनी भगवानबाबांचं गाव असलेल्या बीडच्या सावरगावात दसरा मेळावा घ्यायला सुरुवात केली होती, भगवान भक्तीगड असं त्यांनी त्यांचं नामकरण केलं.
नामदेव शास्त्रीचा ज्ञानेश्वरीवर दांडगा अभ्यास असल्याने ते देशासह परदेशात देखील जाऊन प्रवचने घेत असल्याचं देखील समोर आलं आहे, परदेशात देखील नामदेव शास्त्रींचे मोठे भाविक असल्याचं बोललं जातं. नामदेव शास्त्रींचे विदेश दौऱ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे फोटो स्वत: नामदेव शास्त्रींनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये दिसत असलेल्या नामदेव शास्त्रींच्या जॅकेटवरुन, गॉगलवरुन, शूजवरुन आता टीका होते आहे. शास्त्रींकडे विदेश दौरे करायला, इतके महागडे कपडे घ्यायला पैसे कुठून आले? असा सवाल उपस्थित केला जातोय.
तर हा होता भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रीचा इतिहास. एकीकडे मंत्री धनंजय मुडेंची पाठराखण तर दुसरीकडे देशमुखांच्या कुटुंबाच्या पाठिशी असल्याची ग्वाही नामदेव शास्त्रींनी दिली आहे.
ADVERTISEMENT
