नामदेव शास्त्रींना चिंता संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांच्या मानसिकतेची, म्हणाले अगोदर 'त्यांना' मारहाण...
Namdev Shastri on Santosh Deshmukh Murder: मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण करत असतानाच नामदेव शास्त्री यांना संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांच्या मानसिकतेची चिंता वाटत आहे. त्याबाबत त्यांनी तसं वक्तव्य देखील केलं आहे.
ADVERTISEMENT

Namdev Shastri: बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणमुळे सध्या अवघा बीड जिल्हा ढवळून निघाला आहे. त्यातच सर्वपक्षीय नेत्यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. असं असताना काल (31 जानेवारी) अचानक धनंजय मुंडे यांनी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. ज्यानंतर मीडियाशी बोलताना नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंना भक्कम पाठिंबा असल्याचं सांगितलं. पण त्याचवेळी त्यांनी एक वादग्रस्त विधान देखील केलं.
'मला अजूनही मीडियाला विचारावं वाटतं की, ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निर्घृण हत्या केली. त्यांची मानसिकता का बिघडली हे मीडियाने का नाही दाखवली? कारण की, त्यांना अगोदर जी मारहाण झाली आहे ती पण दखल घेण्याजोगी आहे. असं मला वाटतं.' असं म्हणत नामदेव शास्त्री यांनी खरं तर मारेकऱ्यांची मानसिकता कशी बिघडली? असा भुवया उंचावणारा सवाल उपस्थित केला.
हे ही वाचा>> धनंजय मुंडेंवरचा 'तो' प्रश्न अन् नामदेव शास्त्री मुंबई Tak च्या LIVE शोमधून उठून गेले!
'मारेकऱ्यांना अगोदर जी मारहाण झाली आहे ती पण दखल घेण्याजोगी आहे...', पाहा नामदेव शास्त्री नेमकं काय म्हणालेले
'तास, दोन तास आम्ही बोललो दोघं व्यवस्थित.. राजकीय बोललो, सामाजिक बोललो.. आध्यात्मिक बोललो.. दोन-अडीच तास चर्चा झाली. त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला मी. सगळं समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की, जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आला आहे आणि पक्षाचे सगळे नेते ज्याचे बालमित्र आहेत त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात? असं मला वाटतं. कारण की, इतक्या वर्षांपासून तो जवळ आहे. गोपीनाथरावांचा पुतण्या आहे. त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची राहिलेली नाहीच.'
हे ही वाचा>> Dhananjay Munde : "भगवानगडाच्या पाठिंब्यामुळे मोठी ताकद मिळाली, आत्मविश्वास वाढला"
'त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवतायेत असं मला वाटतं. पण यात नुकसान आमच्या संप्रदायाचं इतकं झालं की, गेल्या 700 वर्षांपासून जातीवाद नसावा या मताचे ज्ञानेश्वर महाराज आहेत. जातीवाद नष्ट होत असताना काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफळून आणला. हे संतांच्या कार्यावर कुठे तरी पाणी फिरलं असं वाटतं.'










