तानाजी सावंतांच्या कुटुंबात राजकीय भूकंप? पुतण्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
BJP Maharashtra : धाराशिव जिल्ह्यातील भूम-परंडा-वाशी मतदारसंघात नवे राजकीय समीकरण पुढे येताना दिसत असून शिवसेना नेते डॉ. तानाजी सावंत यांचे पुतणे तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांनी आज भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तानाजी सावंतांच्या पुतण्याचा भाजपात प्रवेश
भूम-परंडा-वाशी मतदारसंघात राजकारण तापणार
धाराशिव : गणेश जाधव - धाराशिव जिल्ह्यातील भूम-परंडा-वाशी मतदारसंघात नवे राजकीय समीकरण पुढे येताना दिसत असून शिवसेना नेते डॉ. तानाजी सावंत यांचे पुतणे तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या कुटुंबीयांनी आज भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. या घडामोडींमुळे सावंत कुटुंबातच राजकीय संघर्ष उभा राहण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
तानाजी सावंतांच्या पुतण्याचा भाजपात प्रवेश
नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत धनंजय सावंत यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत विजय मिळवला होता. मात्र स्वतः पक्षप्रवेश न करता त्यांच्या पत्नी सौ. ज्योतीताई सावंत, मुलगी तसेच कुटुंबातील इतर सदस्य आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आगामी काळात डॉ. तानाजी सावंत यांच्या विरोधात भाजपने राजकीय डावपेच रचल्याचे बोलले जात आहे.या साठी भाजप युवा नेते मल्हार राणाजगजीतसिंह पाटील यांनी पुढाकार घेऊन हा पक्ष प्रवेश केला आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते मुंबईतील प्रदेश भाजप कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शिवगिरी अॅग्रोचे व्हाइस चेअरमन संजय सावंत यांच्यासह शिवसेना जिल्हा समन्वयक गौतम लटके, दत्तात्रय मोहिते आणि अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपची वाट धरली.
या कार्यक्रमास आमदार राणा जगजितसिंह पाटील, मल्हार दादा पाटील, माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, अनिल काळे, राहुल काकडे, सुजित साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.










