जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

Satyapal Malik Passed Away: जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी (5 ऑगस्ट) दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले.

Mumbai Tak

मुंबई तक

05 Aug 2025 (अपडेटेड: 05 Aug 2025, 02:34 PM)

follow google news

नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी (5 ऑगस्ट) दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. ते बऱ्याच काळापासून मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना 11 मे रोजी दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज त्यांनी याच रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

हे वाचलं का?

सत्यपाल मलिक हे ऑगस्ट 2018 ते ऑक्टोबर 2019 पर्यंत जम्मू आणि काश्मीर राज्याचे शेवटचे राज्यपाल होते. त्यांच्याच कार्यकाळात 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द करण्यात आले होते. ज्यामुळे जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यात आला होता. ज्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाख यांचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले. आज या निर्णयाचा 6 वा वर्धापन दिन आहे आणि याच दिवशी सत्यपाल मलिक यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

हे ही वाचा>> ‘निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामा घडवलं?’, सत्यपाल मलिकांच्या खळबळजनक आरोपानंतर राऊतांचा हल्लाबोल

ते ऑक्टोबर 2017 ते ऑगस्ट 2018 पर्यंत बिहारचे राज्यपाल होते. 21 मार्च 2018 ते 28 मे 2018 पर्यंत त्यांना ओडिशाचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. जम्मू आणि काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन झाल्यानंतर सत्यपाल मलिक यांची गोव्याचे 18 वे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी ऑक्टोबर 2022 पर्यंत मेघालयाचे 21 वे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले होते.

सत्यपाल मलिक यांचा राजकीय प्रवास

सत्यपाल मलिक यांचा जन्म 24 जुलै 1946 रोजी उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील हिसावडा गावात एका जाट कुटुंबात झाला. त्यांनी मेरठ विद्यापीठातून विज्ञान पदवी आणि एलएलबी पदवी प्राप्त केली. 1968-69 मध्ये, ते मेरठ विद्यापीठाचे विद्यार्थी संघाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले, ज्याने त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झालेली. राजकारणी म्हणून त्यांचा पहिला मोठा कार्यकाळ 1974-77 दरम्यान उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य म्हणून होता. 1980-1986 आणि 1986-89 पर्यंत त्यांनी राज्यसभेत उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले. 1989 ते 1991 पर्यंत ते जनता दलाचे सदस्य म्हणून अलीगढ येथून 9 व्या लोकसभेचे सदस्य होते. 

डावी लोकदल आणि काँग्रेसमध्ये झाले सामील 

1980 मध्ये सत्यपाल मलिक यांना चौधरी चरण सिंह यांच्या नेतृत्वाखालील लोकदलाने राज्यसभेवर पाठवले होते. परंतु 1984 मध्ये ते काँग्रेसमध्ये सामील झाले आणि पक्षाने त्यांना 1986 मध्ये राज्यसभेवर पाठवले. बोफोर्स घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्यांनी 1987 मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला आणि व्ही.पी. सिंग यांच्यासोबत गेले. 1989 मध्ये त्यांनी जनता दलाचे उमेदवार म्हणून अलीगढ येथून लोकसभा निवडणूक जिंकली आणि 1990 मध्ये काही काळासाठी संसदीय कामकाज आणि पर्यटन राज्यमंत्री म्हणून काम पाहिले.

हे ही वाचा>> satyapal Malik : “भाजपमध्ये भरपूर लोक आहेत, ज्यांच्यावर ईडी, सीबीआय, आयटीच्या धाडी पडू शकतात”

2004 मध्ये, मलिक भाजपमध्ये सामील झाले आणि बागपत येथून लोकसभा निवडणूक लढवली, परंतु तत्कालीन आरएलडी प्रमुख अजित सिंग यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. 

मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात, भूसंपादन विधेयकावर विचार करणाऱ्या संसदीय पथकाचे प्रमुख म्हणून मलिक यांची नियुक्ती केली. त्यांच्या पॅनेलने विधेयकाविरुद्ध अनेक शिफारशी केल्या, त्यानंतर सरकारने महत्त्वाची सुधारणा बाजूला ठेवली. काश्मीरमध्ये दहशतवाद सुरू झाल्यापासून जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल म्हणून नियुक्त झालेले सत्यपाल मलिक हे पहिले राजकारणी होते.

मोदींवर उघडपणे टीका करणारे नेते 

जम्मू-काश्मीरमधून गोवा राजभवनात पाठवल्यानंतर सत्यपाल मलिक यांच्या वृत्तीत बदल दिसून आला आणि ते मोदी समर्थकांपासून त्यांचे सर्वात मोठे टीकाकार बनले. 2022 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्यपाल मलिक यांनी घोषणा केली होती की ते आरएलडी आणि समाजवादी पक्षाला पाठिंबा देतील. 

बागपतमधील त्यांच्या हिसवाडा गावात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले होते की, 'सक्रिय राजकारणात येण्याचा माझा कोणताही हेतू नाही, उलट मला आरएलडी आणि सपासाठी मार्गदर्शक म्हणून काम करायचे आहे आणि मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांना बळी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि हक्कांसाठी लढायचे आहे.'

    follow whatsapp