मुंबई: विधानसभेत रमी खेळणं हे महाराष्ट्रचे कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटेंना फार महागात पडलं आहे. कारण याच रमी खेळाची आता त्यांना मोठी किंमत चुकवावी लागली आहे.माणिकराव कोकाटे यांना अखेर त्यांचं कृषी खातं गमवावं लागलं आहे. पण त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बाब अशी ठरली की, त्यांचं मंत्रिपद कायम राहिलं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री दत्तात्रय भरणे यांना आता कृषी मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.
ADVERTISEMENT
माणिकराव कोकाटे हे विधानसभेत रमी खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यापासून विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. तसंच त्यांचं मंत्रिपद काढून घ्यावं अशी सातत्याने मागणी करत होते. दरम्यान, वाढता दबाव लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी माणिकराव कोकटेंचं कृषी खातं काढून घेतलं आहे. त्याऐवजी त्यांना दत्तात्रय भरणे यांच्याकडे असलेलं काहीसं कमी महत्त्वाचं समजलं जाणारं क्रीडा आणि युवक कल्याण हे खातं देण्यात आलं.
हे ही वाचा>> Breaking News: राष्ट्रवादीत मोठी खळबळ! माणिकराव कोकाटेंबाबत 'हा' निर्णय झाला, स्वत: अजित पवारांनीच CM फडणवीसांना सांगितलं तुम्ही...
मुंबई Tak च्या वृत्तावर शिक्कामोर्तब
माणिकराव कोकाटे यांचं कृषी खातं जाणार आणि त्याऐवजी राज्याचे नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे होणार असं वृत्त मुंबई Tak ने काल (31 जुलै) दुपारच्या सुमारासच दिलं होतं. ज्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. कारण याबाबतची अधिसूचना सरकारकडून जारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये माणिकराव कोकाटेंचं कृषी खात बदलण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे.
माणिकराव कोकाटेंना मिळालं 'हे' खातं, दत्तात्रय भरणे नवे कृषी मंत्री... पाहा 'ती' अधिसूचना जशीच्या तशी
सामान्य प्रशासन विभाग,
मंत्रालय, मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरू चौक,
मुंबई - ४०००३२.
महाराष्ट्र शासन कार्यनियमावली.
दिनांक ३१ जुलै, २०२५.
क्रमांक शाकानि-२०२४/प्र.क्र.८६/रवका-१.-महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीच्या नियम ५ च्या तरतुदींस अनुसरून, महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या सल्ल्यावरुन, याद्वारे, शासकीय अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक शाकानि- २०२४/प्र.क्र.८६(१)/रवका-१, दिनांक २१ डिसेंबर २०२४, यामध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहेत:-
उक्त अधिसूचनेमध्ये,-
(एक) - नोंद क्रमांक २२ मध्ये, “श्री. दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे” यांच्या नावासमोरील स्तंभ (२) मधील, “विभाग किंवा त्यांचे भाग” या शीर्षाखालील, “क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ” या मजकुराऐवजी, “कृषी” हा मजकूर दाखल करण्यात येईल ;
हे ही वाचा>> 'जगातील कोणत्याही नेत्याने 'ऑपरेशन सिंदूर' बंद करा असं सांगितले नाही', पंतप्रधान मोदींनी स्पष्ट करून टाकलं
( दोन ) नोंद क्रमांक २५ मध्ये, “ॲड. माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे” यांच्या नावासमोरील स्तंभ (२) मधील, “विभाग,
किंवा त्यांचे भाग” या शीर्षाखालील, “कृषी” या मजकुराऐवजी, “क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ” हा मजकूर दाखल करण्यात येईल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
मनिषा वर्मा,
शासनाच्या अपर मुख्य सचिव.
माणिकराव कोकाटेंचं कृषी खातं काढून घेतलं पण मंत्रिपद कायम
याचाच अर्थ माणिकराव कोकाटे यांच्याकडे असलेलं अत्यंत महत्त्वाचं असं कृषी खातं काढून त्यांना क्रीडा खातं देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला.
एकीकडे विरोधक माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करत होते. पण तूर्तास अजित पवारांनी कोकाटेंचं खातं बदलून विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे कोकाटे यांना देखील मंत्रिमंडळात शाबूत ठेवलं आहे.
ADVERTISEMENT
