रायगड: शेतकरी कामगार पक्षाच्या रायगडमधील मेळाव्याला आज (2 ऑगस्ट) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विशेष उपस्थिती लावली होती. यावेळी राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली आहे.
ADVERTISEMENT
मुंबई Tak बैठक या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते की, काहीही झालं तरी महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करणारच. त्यानंतर राज ठाकरे हे पुन्हा आक्रम झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी हिंदी सक्ती लागू करावी. असं आव्हानंच त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं होतं. त्यातच आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना त्यांनी डिवचलं आहे. 'महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा महाराष्ट्रातील लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय.' अशी बोचरी टीका राज ठाकरेंनी केली आहे.
पाहा राज ठाकरे नेमकं काय म्हणाले...
'महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा महाराष्ट्रातील लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय. पण महाराष्ट्रात जे कामधंद्यासाठी येतायेत त्यांना मराठी कशी येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्यांच्या मनात. महाराष्ट्रातील मराठी माणूस, भूमिपुत्र याचा विचारच नाही.'
हे ही वाचा>> 'दुबे तुम मुंबई आओ.. तुझे समंदर में दुबे, दुबेकर मारेंगे...', भर सभेत राज ठाकरेंचा खासदार दुबेंवर ठाकरी प्रहार!
'आज सगळ्याचं विदारक स्वरूप जर कुठे असेल तर तो रायगड जिल्हा आहे. रायगड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत. कुंपणच शेत खातंय.. उद्योगधंदे येतायेत त्यासाठी बाहेरच्या राज्यातून माणसं येतायेत.'
'मी या हिंदीच्या प्रश्नावर पण बोललो होतो. जे शिक्षणमंत्री भुसे आले होते ना माझ्याकडे.. त्यांना विचारलं होतं. गुजरातमध्ये आहे का हिंदी? तर म्हणाले तर नाहीए. मग म्हटलं महाराष्ट्रात का आणतायेत?'
'यांचं काय राजकारण चाललंय ना ते आपण समजून घेतलं पाहिजे. राजकीय पक्ष, निवडणुका येतील-जातील. पण एकदा तुमची भाषा संपली आणि जमीन गेली तर जगात तुम्हाला काहीही स्थान नाही.'
'मी तुम्हाला गुजरातमधील जागेची परिस्थिती म्हणजे शेती जमीन याबाबत सांगणार आहे. जे गुजरातचे रहिवासी नाहीत किंवा अनिवासी भारतीयांना शेतजमीन विकत घेता येत नाही. म्हणजे महाराष्ट्रातून तुम्ही गुजरातमध्ये गेलात तर तुम्हाला शेत जमीन विकत घेता येणार नाही. हे भारतात सुरू आहे हा. हे आपल्या देशातच चालू आहे. ज्या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री ज्या गुजरात राज्याचे आहेत त्यांच्या राज्यातील शेतजमीन कोणीही नागरिक जाऊन विकत घेऊ शकत नाही.'
हे ही वाचा>> 'फडणवीसजी हिंदी आणायचा प्रयत्न तर करून बघा, फक्त दुकानं नाही... ', राज ठाकरेंचं खुलं आव्हान
'समजा, ती विकत घ्यायची असेल तर फेमा नावाचा कायदा आहे. त्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडून विशेष परवानगी घ्यावी लागते. प्रत्येक जण आपल्या राज्यातील, आपल्या माणसांचा विचार करत असतो. आम्ही का नाही करायचा?'
'आज आपल्याकडे कोण येतं आणि कोण जमिनी घेतंय हे माहिती नाही. जवळपास उत्तरेकडील धनदांडगे आहेत त्यांनी कोकणात जमिनी घेऊन ठेवल्या आहेत. तुम्ही जर कुठल्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं. एकदा करूच देत.' असं घणाघाती भाषण राज ठाकरेंनी यावेळी केलं आहे.
ADVERTISEMENT
