धक्कादायक.. विजय रुपाणी चाललेले पत्नी आणि मुलीला भेटायला, पण.. माजी मुख्यमंत्र्यांचा दुर्दैवी मृत्यू

Vijay Rupani Death: गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे अहमदाबाद विमान अपघातात निधन झाल्याच्या वृत्ताला आता पुष्टी मिळाली आहे. रुपाणी हे त्यांच्या पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते.

माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचा दुर्दैवी मृत्यू

माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई तक

• 09:12 PM • 12 Jun 2025

follow google news

अहमदाबाद: अहमदाबाद विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या दुःखद अपघातात 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. याच अपघातग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील होते. ज्यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याचं आता समोर आलं आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताबाबत गुजरात भाजप अध्यक्ष सीआर पाटील यांनी पुष्टी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय रुपाणी हे त्यांच्या पत्नी अंजली आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते. आतापर्यंत या अपघातात 204 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, 41 जखमींवर उपचार सुरू आहेत.

हे वाचलं का?

गुजरात भाजप अध्यक्ष सीआर पाटील यांनी तीव्र शोक व्यक्त केला आणि सांगितले की, 'या अपघातात विमानातील प्रवाशांसह, वसतिगृहात राहणाऱ्या डॉक्टर विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील गुजरातला पोहोचले आहेत आणि परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. भाजप परिवारालाही या घटनेचे खूप दुःख आहे.'

हे ही वाचा>> Aparna Mahadik: अपघात झाला त्याच Air India विमानात होत्या सुनील तटकरेंच्या नातेवाईक, अपर्णा महाडिक कोण आहेत?

यासोबतच त्यांनी माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि सर्व दिवंगत आत्म्यांना शांती मिळावी अशी प्रार्थना केली. या कठीण काळात शोकाकुल कुटुंबाला धीर आणि धैर्य मिळावे अशीही त्यांनी प्रार्थना केली.

दुसरीकडे, विमान अपघाताची बातमी मिळताच विजय रुपाणी यांच्या  शेजाऱ्यांनी ते सुखरूप असावे यासाठी पूजा-अर्चाही सुरु केली होती. मात्र, आता त्यांच्या निधनाचं वृत्त समोर आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

विजय रुपाणी एक सज्जन राजकारणी होते: सुनील जाखड

भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील जाखड यांनी माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, 'आज अहमदाबादमध्ये अपघात झालेल्या एअर इंडियाच्या दुर्दैवी विमानात विजय रुपाणी होते हे जाणून अत्यंत दुःख झाले.'

सुनील जाखड म्हणाले, "गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून रूपाणीजींचे योगदान नेहमीच लक्षात राहील. ते एक नम्र, संवेदनशील आणि तळागाळातील नेते होते. पंजाब भाजपचे प्रभारी असताना त्यांच्यासोबत काम करण्याचे भाग्य मला मिळाले. ते खरोखरच एक "सज्जन राजकारणी" होते. गुजरातने एक महान नेता गमावला आहे, परंतु माझ्यासाठी हे वैयक्तिक नुकसान आहे कारण त्यांच्या सौम्य आणि साध्या स्वभावाने मला नेहमीच प्रभावित केले. सार्वजनिक जीवनातील त्यांचे शहाणपण आणि साधेपणा नेहमीच लक्षात राहील. रूपाणीजींना माझी श्रद्धांजली."

हे ही वाचा>> मोठी बातमी: 'कोणीही वाचण्याची शक्यता नाही', 242 जण असलेल्या Air India विमान अपघाताबाबत खळबळ उडवणारी अपडेट

आतापर्यंत 204 मृतदेह सापडले 

अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी.एस. मलिक यांनी आज तकशी बोलताना सांगितले की, 'आतापर्यंत 204 मृतदेह सापडले आहेत, तर 41 जण जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल आहेत. ते म्हणाले की, मदत आणि बचाव कार्य अजूनही वेगाने सुरू आहे आणि ढिगाऱ्यात आणखी लोक अडकले असण्याची भीती आहे.' 

आयुक्तांच्या मते, हे आकडे प्राथमिक आहेत. अंतिम पुष्टी नंतर केली जाईल. अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांकडून त्यांची ओळख पटविण्यासाठी डीएनए नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव धनंजय द्विवेदी म्हणाले की, पीडितांची ओळख पटविण्यासाठी बी.जे. मेडिकल कॉलेजच्या कसोटी भवनमध्ये ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

विमान मेडिकल कॉलेजच्या इमारतीत कोसळलं

प्रत्यक्षदर्शींच्या मते, उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमानाची उंची कमी झाली आणि प्रथम ते बी.जे. मेडिकल कॉलेजच्या मेस इमारतीशी धडकले. त्यानंतर, विमान जवळच्या अतुल्यम वसतिगृहावरही आदळले, जिथे वरिष्ठ निवासी डॉक्टर राहत होते. या धडकेमुळे या इमारतींना आग लागली आणि अनेक लोक गंभीर जखमी झाले.
 

    follow whatsapp