आघाडीत बिघाडी, युतीत कुस्ती! लय हायहोल्टेज लढती.. पश्चिम महाराष्ट्रात नादखुळा राजकारण

Nagar Parishad and Nagar Panchayat Western Maharashtra Election: नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात जोरदार राजकीय लढाई पाहायला मिळणार आहे. त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट.

Mumbai Tak

निलेश झालटे

07 Nov 2025 (अपडेटेड: 07 Nov 2025, 08:57 AM)

follow google news

पुणेः आपण आता पश्चिम महाराष्ट्रातल्या अशा इन्ट्रेस्टिंग लढतीबाबत महिती पाहणार आहोत की, जे बघून आपणही विचारात पडाल. राजकारणाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात या निवडणुकीचा रोमांच शिगेला पोहोचला आहे. पश्चिम महाराष्ट्रातले बडे नेते आता या निवडणुकीसाठी कामाला लागलेत, पक्ष कामाला लागलेत. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी महायुती विरुद्ध महायुती आणि मविआ विरुद्ध मविआ अशा लढाया सुद्धा होणार आहेत. 

हे वाचलं का?

राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदांसाठी आणि थेट अध्यक्षपदासाठी निवडणूक होतेय. सगळे भावी सध्या तयारीला लागले आहेत. राज्यभरात आता छोट्या शहरांमध्ये लगबग सुरुय. बैठकांवर बैठका होताहेत, सत्ताधारी-विरोधक आणि बंडखोर देखील तयारीला लागलेत.  

2 डिसेंबरला मतदान; तर 3 डिसेंबरला निकाल येणाराय आणि बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या पालिका, नगरपंचायतींमध्ये लोकप्रतिनिधी बसणार आहेत. 

आता पश्चिम महाराष्ट्रातल्या पाच महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये 60 नगर परिषद आणि नगर पंचायतीमध्ये रणधुमाळी गाजणाराय, धुरळा उडणाराय. 

पुणे कोल्हापूर सोलापूर सांगली साताऱ्यातील इन्ट्रेस्टिंग लढतींबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया.

प. महाराष्ट्रातील राजकीय धुरळा

पुणे जिल्ह्यात एकूण 17 नगरपरिषदा आणि नगर पंचायत निवडणुकीचा रोमांच शिगेला पोहोचलाय. यात आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी- उरळी देवाची, इंदापूर, जेजूरी, जुन्नर, लोणावळा, मालेगाव बु. (न.पं.), मंचर (न.पं.), राजगुरुनगर, सासवड, शिरुर, तळेगाव- दाभाडे आणि वडगाव (न.पं.). याचा समावेश आहे. आता यात अर्थातच अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे ते बारामती नगर परिषदेकडे. 

लोकसभा विधानसभेप्रमाणे इथं पवार विरुद्ध पवार अशी लढाई होतेय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजितदादांचे जय पवारांचं नाव इथं चर्चेत आलंय. त्यामुळं अजून या जागेची चर्चा होतेय. शरद पवार गटाकडून कोण उतरतंय हे अजून गुलदस्त्यात आहे. ही लढत इन्ट्रेस्टिंग असणार हे मात्र नक्की. 

याशिवाय इंदापूरमध्ये पुन्हा हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजितदादा असंच एकंदरीत चित्र इथं असेल. दत्तात्रय भरणेंच्या नेतृत्त्वात इथे हर्षवर्धन पाटलांना चॅलेंज केलं जाईल. अनेक वर्षापासून इथं हर्षवर्धन पाटलांचा होल्ड आहे. आता हर्षवर्धन पाटील आणि भाजपचे नेते प्रवीण माने यांच्या स्थानिक युतीची चर्चा ही जोरदार सुरू आहे. त्यामुळं इथली लढत रंजक असणार आहे. 

याशिवाय तळेगाव, भोर, सासवडसह बाकीच्या निवडणुका देखील चर्चेत आहेत. यात अनेक ठिकाणी महायुती विरुद्ध महायुती, मविआ विरुध्द मविआ चित्र आहे. यामुळं बंडखोरी रोखण्याचं आव्हान सर्वच प्रमुख नेत्यांसमोर असणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट, अकलूज, अनगर (न.पं.), बार्शी, दुधनी, करमाळा, कुर्डूवाडी, मैदर्गी, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर आणि सांगोला नपा नपंच्या निवडणुका होताहेत. सोलापुरात सर्वच लढती रंगंतदार होणार आहेत. सोलापुरात महायुतीतला वाद अलीकडे फारच चर्चेत आहे. अशात या निवडणुका होताहेत. त्याचा परिणाम हा निवडणुकांवर शंभर टक्के होणार आहे. 

जिल्ह्यातली लढाई ही महायुती विरुद्ध मविआ नाही तर महायुती vs महायुती अशीच जास्त असणार आहे. बंडखोरीची शक्यता अनेक ठिकाणी आहे, भाजपमध्ये इनकमिंग जास्त झालेलं आहे. भाजपचे जयकुमार गोरे, सचिन कल्याणशेट्टी, राष्ट्रवादी SPचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार प्रणिती शिंदे आणि सर्वच आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. 

लोकसभेला मविआ प्रभावी राहिली, विधानसभेत महायुतीचा प्रभाव राहिलाय. त्यामुळं आता हे नेते कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत कसा जोर लावतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

बार्शी- राजेंद्र राऊत विरुद्ध दिलीप सोपल. या दोघांमध्ये थेटच लढत असते. पक्ष कोणतेही असो इथं राजकारण दोन नेत्यांमध्ये फिरतं. राऊतांकडे नगरपालिका मागच्या टर्मला होती. विधानसभेला पराभूत झाले असले तरी राऊतांचा वावर जिल्ह्याच्या राजकारणात वाढलाय, प्रभाव वाढलाय, त्यामुळं त्यांना ही निवडणूक जिंकून तो प्रभाव कायम ठेवण्याचं आव्हान असेल. 

दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असलेल्या दिलिप सोपलांना पुन्हा नगरपालिका खेचून आणण्याचं आव्हान आहे. आमदारकी मिळवल्यानंतर शहरात वर्चस्व दाखवण्याचं हे आव्हान ते कसं पेलतील हे पाहणं महत्त्वाचं असेल. महिला राखीव सीट असल्यानं हे नेते आपल्या घरातूनच कुणाला संधी देतात की एखाद्या कार्यकर्त्याला संधी देतात हे पाहणं देखील महत्त्वाचंय. 

मोहोळ- राजन पाटील आणि उमेश पाटील महायुतीत वाद आहे. इथं राजन पाटलांची सत्ता बऱ्याच वर्षांपासून आहे. त्यांचं वर्चस्व देखील दिसून आलेलं आहे. मात्र त्यांना विरोध हा युतीतूनच होणार आहे.त्यामुळं या गाजलेल्या वादावर वरुन कसा तोडगा निघतोय हे महत्त्वाचं आहे. 

इकडे अक्कलकोट, मैदर्गी, दुधनीमध्ये महायुतीतच वाद आहे. भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी विरुद्ध शिंदे गटात काँग्रेसमधून आलेले सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात या तीन ठिकाणी लढती होतील. कल्याणशेट्टी यांचं वजन जिल्ह्याच्या राजकारणात वाढतंय. त्यांना मुंबईतून तशी ताकदही दिली जातेय. त्यामुळं त्यांना घेरण्यासाठी म्हेत्रे हे (काँग्रेस-राष्ट्रवादी शप) सोबत युती करणार असल्याचं देखील बोललं जातंय. 

कोल्हापूरमध्ये आजरा (न.पं.), चंदगड (न.पं.), गडहिंग्लज, हातकणंगले, हुपरी, जयसिंगपूर, कागल, कुरुंदवाड, मलकापूर, मुरगूड, पन्हाळा, शिरोळ आणि वडगावच्या निवडणुका होताहेत.  चंदगड, आजरा, हातकणंगले, शिराेळ या नगरपंचायती आणि हुपरी या नगरपालिकेची पाच वर्षांपूर्वी स्थापना करण्यात आली. प्रमुख चार पक्षांचे झालेले सहा पक्ष, गेल्या आठ वर्षात बदललेली राजकीय परिस्थिती आणि इच्छुकांची वाढलेली संख्या यामुळे या सर्व ठिकाणी टोकाचा राजकीय संघर्ष पहावयास मिळणार आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप आणि शिंदेसेना असे सत्तारूढ तीन पक्ष असल्याने या सर्वच ठिकाणी तुल्यबळ लढती होणार असून, काही ठिकाणी महायुतीविरोधात महाविकास आघाडी अशी थेट लढत होईल, तर काही ठिकाणी महायुतीमध्येच एकमेकांविरोधात शड्डू ठोकला जाणार आहे. कागलमध्ये मुश्रीफ विरुद्ध घाटगे यांच्यातला संघर्ष पाहायला मिळेल. एकंदरीत जिल्ह्यात सतेज पाटील, धनंजय महाडिक, विनय कोरे, हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, राजेंद्र यड्रावकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. 
 
सांगलीमध्ये जिल्ह्यातील उरुण-ईश्वरपूर, तासगाव, विटा, जत, आष्टा नगरपालिका आणि पलूस, शिराळा, आटपाडी नगरपंचायतीमधील आठ नगराध्यक्षांसह 189 नगरसेवकांच्या जागांसाठी लढाई होणाराय. इथे दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.  तासगाव- रोहित पाटलांची प्रतिष्ठा पणाला, संजय काका पाटील यांच्याविरुद्ध इथं संघर्ष पाहायला मिळेल. ईश्वरपूरमध्ये जयंत पाटील विरुद्ध सगळे एकत्र अशी लढत आहे. (आनंदराव मलगुंडे SP- विश्वनाथ डांगे भाजप यांच्यात थेट सामना होतोय. 
विटा नगरपालिकेत शिवसेना शिंदे विरुद्ध भाजप लढत होणार आहे. भाजप नेते ॲड. वैभव पाटील विरुद्ध शिवसेनेचे विद्यमान आमदार सुहास बाबर गट या महायुतीतच प्रमुख लढत होणार आहे. गेल्या 50 वर्षांपासून विटा नगरपालिकेवर माजी आमदार सदाशिवराव पाटील घराण्याची एकहाती सत्ता आहे; परंतु गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार बाबर यांना शहरात मोठे मताधिक्य मिळाले. त्यामुळे यावेळी आमदार सुहास बाबर व सत्ताधारी गटाचे नेते ॲड. वैभव पाटील यांच्यात लढत तुल्यबळ होण्याचे संकेत आहेत.
आटपाडी नगरपंचायतीच्या पहिल्याच थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महायुतीचेच घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने शहरातील राजकारण तापले आहे.  आटपाडी शहरात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख, शिंदे सेनेचे तानाजी पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राजेंद्र देशमुख, युवक जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, स्वाभिमानी गटाचे नेते भारत पाटील, आनंदराव पाटील आणि आरपीआयचे राजेंद्र खरात आदी नेत्यांची समीकरणे आता बदललेली दिसत आहेत. यामुळे निवडणुकीत अनपेक्षित गठबंधन होण्याची शक्यता आहे. भाजपचा पडळकर व देशमुख गट हातमिळवणीच्या तयारीत असल्याची चर्चा आहे, तर शिंदे सेनेचे तानाजी पाटील स्वतंत्रपणे मैदानात उतरतील अशी चिन्हे आहेत.

एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रातील या पाच जिल्ह्यात सर्व लढती रंजक होणार आहेत. मात्र अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना, भाजप विरुद्ध अजितदादांची राष्ट्रवादी काही ठिकाणी मविआतील पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडणार आहे. ही ठिणगी आगामी जिल्हा परिषदा आणि महापालिकांच्या निवडणुकांमध्ये देखील पडणार आहेच. यातून मध्यममार्ग काढण्याचं आव्हान मुंबईत बसलेल्या सर्वच पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसमोर आहे. हे आव्हान ते कसं पेलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.

    follow whatsapp