नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला आता नाट्यमय वळण मिळालं आहे. जंतरमंतर मैदानापासून संसद भवनापर्यंत आज मोर्चा काढण्यात येणार होता. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने तरुण आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मात्र, संसद भवनाच्या दिशेने निघालेल्या आंदोलकांना अडवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली.
ADVERTISEMENT
आंदोलकांना रोखण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर
आंदोलक पुढे सरकू नये म्हणून दिल्ली पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला तसेच अश्रुधुराच्या कांड्यांचा वापर करण्यात आला आहे. यानंतर आंदोलनस्थळी बराच काळ गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
हे ही वाचा>> CJP आंदोलकांवर निर्घृणपणे लाठीचार्ज, जंतर-मंतरवर नेमका राडा झाला तरी कसा? पाहा VIDEO
सोनम वांगचूक रुग्णालयात; नेतृत्वाची धुरा प्रकाश राज यांच्या हाती
या आंदोलनाचं नेतृत्व करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक हे आमरण उपोषणामुळे प्रकृती खालावल्याने ते रुग्णालयात आहेत. त्यामुळे आंदोलनाचं नेतृत्व अभिनेते प्रकाश राज यांनी स्वीकारलं. त्यांच्यासोबत अभिजीत दिपके यांनीही आंदोलकांना मार्गदर्शन करत आंदोलनाची धुरा सांभाळली.
ट्रकवरून आंदोलनाची सुरुवात; पोलिसांनी रस्त्यातच रोखला ताफा
प्रकाश राज यांनी आंदोलकांना संबोधित करण्यासाठी आणि मोर्चाचं नेतृत्व करण्यासाठी एका ट्रकवर चढून मोर्चाची सुरुवात केली. मात्र, दिल्ली पोलिसांनी हा ट्रक रस्त्यातच अडवला. एवढंच नव्हे तर, ज्या ट्रकवर प्रकाश राज बसले होते त्या ट्रकच्या टायरमधील हवा एका पोलिसाने काढण्यात आली.
हे ही वाचा>> 'मला मोर्चात सहभागी व्हायचंय, डिस्चार्ज द्या', वांगचुक यांचं पत्र
ट्रकभोवती आंदोलकांचा घेराव
ट्रक थांबविल्यानंतर पोलिसांनी प्रकाश राज यांना ट्रकवरून खाली उतरवण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे आंदोलक संतप्त झाले आणि त्यांनी ट्रकभोवती घेराव घालत पोलिसांविरोधात घोषणाबाजी सुरू केली. काही काळ पोलीस आणि आंदोलक पुन्हा आमनेसामने आल्याने परिसरात तणाव वाढला.
महिलांना मारहाण केल्याचे गंभीर आरोप
दरम्यान, अभिजीत दिपके यांनी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, सोनम वांगचूक यांच्या पत्नीला पोलिसांकडून मारहाण करण्यात आली. तसेच पुरुष पोलिसांनी त्यांचे केस ओढल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. याशिवाय अनेक महिला आंदोलकांनाही पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, या आरोपांबाबत दिल्ली पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
आंदोलनामुळे दिल्लीत तणावपूर्ण वातावरण
सोनम वांगचूक यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या आंदोलनाला आता अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे. प्रकाश राज यांच्या सहभागामुळे आंदोलनाला वेगळं राजकीय आणि सामाजिक महत्त्व प्राप्त झाल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, पोलीस आणि आंदोलक यांच्यातील संघर्षामुळे दिल्लीतील परिस्थिती तणावपूर्ण बनली असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT












