Kolhapur Mahapalika Election : आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात नव्या हालचालींना वेग आला आहे. भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या कुटुंबातून आता नव्या पिढीचा राजकारणात प्रवेश होण्याची शक्यता चर्चेत आहे. महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
ADVERTISEMENT
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णराज महाडिक हे कोल्हापूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक तीनमधून उमेदवारी दाखल करू शकतात. तसे झाल्यास महाडिक कुटुंबाची तिसरी पिढी थेट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणात सक्रिय होणार आहे. अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी हालचाली पाहता त्यांना उमेदवारी दिली जाण्याचे संकेत मिळत आहेत.
कृष्णराज महाडिक यांचा यापूर्वी विधानसभा निवडणूक लढवण्याचा मानस होता. मात्र, त्यावेळी त्यांना संधी मिळाली नव्हती. 2024 ची विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर ते पुढील राजकीय वाटचालीची तयारी करत असल्याची चर्चा होती. अशातच महानगरपालिका निवडणुकीत उतरण्याची शक्यता समोर आल्याने राजकीय समीकरणांमध्ये नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे त्यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केल्याची माहितीही पुढे आली आहे. मात्र, तो अर्ज प्रत्यक्षात दाखल केला जाणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
हेही वाचा : प्रेयसीची निर्घृण हत्या, नंतर मृतदेह पोत्यात भरला अन् 'त्या' ठिकाणी फेकला... हत्येमागचं नेमकं कारण काय?
कृष्णराज महाडिक हे नाव कोल्हापूरमध्ये नवखे नाही. सोशल मीडियावर ते सातत्याने सक्रिय असून ‘क्रिश महाडिक’ या नावाने ते ओळखले जातात. शहरातील आणि ग्रामीण भागातील विविध प्रश्नांवर ते खुलेपणाने भूमिका मांडताना दिसतात. कधी रस्त्याच्या दुरवस्थेवर भाष्य, तर कधी थेट गावात जाऊन स्वच्छता मोहिमेत सहभागी होत असल्याचे व्हिडिओ त्यांच्या माध्यमांतून समोर येतात. त्यामुळे तरुणांमध्ये त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी दिलेल्या ‘कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं’ या घोषणेलाही कृष्णराज महाडिक यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला होता. अनेक वर्षे महानगरपालिकेत सत्ता असूनही अपेक्षित विकास का झाला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तसेच, देश आणि राज्य पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास असल्याचा उल्लेख करत, त्याच नेतृत्वाच्या पाठिंब्याने शहराचा विकास शक्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या या प्रतिक्रियेला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला असून, शेकडो नागरिकांनी ती लाईक केली आहे. एकूणच, कृष्णराज महाडिक यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. आता ते अधिकृतपणे मैदानात उतरणार का, आणि केव्हा घोषणा करणार, याकडे संपूर्ण कोल्हापूरचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











