निलंगा (जि. लातूर) : फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार निलंगा तालुक्यात उघडकीस आला आहे. सततच्या ब्लॅकमेलिंग आणि मानसिक छळाला कंटाळून 16 वर्षीय अनाथ मुलीने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी निलंगा पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात अत्याचार करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमेश शंकर अकोले असे आरोपीचे नाव असून तो फोटोग्राफी व्यवसाय करतो. इयत्ता अकरावीत शिक्षण घेत असलेल्या या अल्पवयीन मुलीशी त्याने ओळख वाढवली. प्रेमाचे नाते असल्याचे भासवत तसेच लग्नाचे आमिष दाखवत त्याने विश्वास संपादन केला. फोटो काढण्याच्या निमित्ताने तो तिच्याशी अधिक जवळीक साधत गेला.
दरम्यान, आरोपीने मुलीचे काही फोटो काढले आणि त्याचाच वापर करून तिला धमकावण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. “फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी करीन” अशी भीती दाखवत तो तिला सातत्याने ब्लॅकमेल करत होता. या धमक्यांच्या आधारे त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा : कल्याणमध्ये स्वकियांकडून ठाकरेंचा घात? वरिष्ठ नेत्याकडून परस्पर आदेश? अर्ज माघारी घेणाऱ्या उमेदवाराचे आरोप
पीडित मुलगी अनाथ होती. लहानपणीच तिच्या आई-वडिलांचे निधन झाले होते. तिचे पालनपोषण व शिक्षण तिचे चुलते करत होते. काही काळापासून ती मानसिक तणावाखाली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मात्र, फोटो व्हायरल करण्याच्या धमकीमुळे ती हा प्रकार कुणालाही सांगू शकली नाही. शुक्रवारी सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास तिने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच निलंगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
मयत मुलीच्या चुलत्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता व पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणे, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग अशा गंभीर कलमान्वये तपास सुरू आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली असून पुढील तपास निलंगा पोलीस करत आहेत. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











