Kalyan-Dombivli Municipal Corporation , डोंबिवली : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजप–शिंदे गटाचे तब्बल 20 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या बिनविरोध विजयामागे विरोधकांचा दबाव नसून, ठाकरे गटातीलच एका वरिष्ठ नेत्याने आपल्या पक्षाच्या उमेदवारांना अर्ज माघारी घ्यायला भाग पाडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे “बाहेरच्यांपेक्षा उद्धव ठाकरेंचा स्वकियांकडूनच घात झाला का?” असा सवाल उपस्थित होत आहे.
ADVERTISEMENT
तात्या माने यांची कथित ऑडिओ क्लीप वैशाली पोटे यांच्याकडून व्हायरल
ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख तात्या माने यांच्यावर उमेदवारांवर दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला असून, प्रभाग क्रमांक 22 मधील ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली पोटे यांनी याबाबत थेट आरोप केले आहेत. पोटे यांनी तात्या माने यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. या कथित ऑडिओमध्ये “हा पक्षाचा आदेश आहे, अर्ज माघारी घ्या” असे तात्या माने यांच्याकडून सांगण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.
हेही वाचा : 'बडोद्यात सगळे महापौर हे गुजराती का होतात? मुंबईत मराठीच महापौर', राज ठाकरेंचा भाजपला करडा सवाल अन्...
या ऑडिओ क्लिपची अधिकृत खातरजमा अद्याप झालेली नसली, तरी ती व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना कोणत्या अधिकारात आणि कुणाच्या सांगण्यावरून माघार घेण्यास सांगण्यात आले? असा थेट प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. उमेदवारांचे म्हणणे आहे की, आम्ही तयारी करून निवडणूक रिंगणात उतरलो होतो, मात्र ऐनवेळी वरिष्ठ नेत्यांकडून आलेल्या दबावामुळे अर्ज माघारी घ्यावे लागले.
या घडामोडींमुळे कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गटात अस्वस्थता वाढली आहे. काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे, भाजप आणि शिंदे गटाने बिनविरोध विजय मिळवल्यानंतर लगेचच हे आरोप समोर आल्याने, या विजयामागे अंतर्गत ‘सेटिंग’ होते का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, या प्रकरणावर ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेतृत्वाची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. मात्र, उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे या प्रकरणावर नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षांतर्गत चौकशी होणार का, की हा प्रकार दुर्लक्षित केला जाणार, याबाबतही संभ्रम आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











