'बडोद्यात सगळे महापौर हे गुजराती का होतात? मुंबईत मराठीच महापौर', राज ठाकरेंचा भाजपला करडा सवाल अन्...
मुंबईतील मराठी महापौर या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. यासोबत त्यांना एक सवालही विचारला आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election)पार्श्वभूमीवर शिवसेना UBT आणि मनसे यांनी आज (4 डिसेंबर) संयुक्त वचननामा प्रसिद्ध केला. ज्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपच्या हिंदू-मराठी महापौर यावर टीका करत त्यांना करडा सवालही विचारला.
'बडोद्यामध्ये सगळे महापौर हे गुजराती का होतात? हा महाराष्ट्र आहे आणि येथील प्रत्येक शहरातील महापौर हा मराठीच होणार. इथे कसलं हिंदू-मराठी करतायेत तुम्ही.. मी त्यादिवशी म्हटलं ना.. आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही.' असं म्हणत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा या मुद्द्यावरून भाजपला ठणकावलं आहे.
हे ही वाचा>> मुंबईत मराठी माणूस ठाकरे बंधूंना साथ देणार की महायुतीला? असेंडिया कंपनीचा सर्वात मोठा सर्व्हे समोर
पाहा मुंबईच्या महापौर पदाबाबत नेमकं काय म्हणाले राज ठाकरे
'थोडासा इतिहास माहिती नसेल तर सांगतो. पेशव्यांच्या काळामध्ये तीन संस्थानं उभी राहिली. त्यामध्ये गुजरातमध्ये गायकवाडांचं, शिंदेंचं.. सिंधिया म्हणतो ते आणि तिसरं होळकरांचं.. जे साम्राज्य उभं राहिलं ते बडोद्याचं साम्राज्य उभं राहिलं. ते मराठेशाहीचं साम्राज्य आहे. बरोबर?'
'अशावेळी त्या बडोद्यामध्ये सगळे महापौर हे गुजराती का होतात? हा महाराष्ट्र आहे आणि येथील प्रत्येक शहरातील महापौर हा मराठीच होणार. इथे कसलं हिंदू-मराठी करतायेत तुम्ही.. मी त्यादिवशी म्हटलं ना.. आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही.'
'तुम्हाला महाराष्ट्रात मराठीचा मान हा राखलाच पाहिजे. त्यामुळे आमचा जो महापौर होईल तो मराठीच होणार. मुंबईचा महापौर मराठीच होणार.' असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
'भाजप मराठी माणसाला हिंदू नाही का समजत?', उद्धव ठाकरेंचा सवाल
दरम्यान, याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी देखील भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, 'याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू नाही का समजत? जसं राज म्हणाला... आम्ही मराठी आहोत अस्सल.. हिंदूच आहोत.. अगदी संयुक्त महाराष्ट्रापासून जो लढा दिला गेला त्यामध्ये आताचं भाजप किंवा तेव्हाचा जनसंघ हा कुठे होता? हा कधी मराठी माणसं आणि हिंदूच्या बाजूने उभा राहिलाय?' असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
हे ही वाचा>> राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनी आले शिवसेना भवनात, युतीचा वचननामा आणि बरंच काही...
ठाकरे बंधूंच्या वचननाम्यातील प्रमुख मुद्दे
- मोफत वीज आणि पाणी - १०० युनिटपर्यंत मोफत वीज आणि घरगुती वापरासाठी मोफत पाणी.
- मालमत्ता कर माफी - ७०० चौरस फूटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर पूर्णपणे माफ.
- स्वस्त घरे - एक लाख स्वस्त घरे बांधण्याची योजना; मुंबई पोर्ट ट्रस्टच्या १८०० एकर जमिनीचा विकास.
- आर्थिक मदत - घरेलू कामगार महिलांना दरमहा १,५०० रुपये मदत.
- स्वस्त जेवण - १० रुपयांत पौष्टिक जेवणाची योजना.
- आरोग्य आणि शिक्षण - सार्वजनिक आरोग्य सुविधांचा विस्तार, शाळांमध्ये सुधारणा आणि मोफत शिक्षण योजना.
- पायाभूत सुविधा - चालण्यायोग्य फूटपाथ, BEST बस सेवेचे पुनरुज्जीवन आणि मुंबईला आर्थिक केंद्र बनवणे.
- रोजगार आणि विकास - मुंबईला 'गिफ्ट सिटी'चा पर्याय बनवून रोजगार निर्मिती.
- पर्यावरण - प्रदूषण नियंत्रण आणि हरित मुंबईसाठी योजना.
- इतर - स्थानिक ओळखीचे रक्षण, मराठी भाषेचा प्रचार आणि भ्रष्टाचारविरोधी उपाय.










