Jayant Patil Press Conference : राष्ट्रवादी शरद पवार गट भाजपप्रणित एनडीए आघाडीत सामील होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यात सर्वात जास्त चर्चेत आहेत ते शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील. पाटील यांनी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यामुळे तर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. त्यांना अर्थमंत्रीपद मिळणार असल्याचे भाकितही अनेकांनी वर्तवले. मात्र जयंत पाटील यांनी याविषयी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सर्व शक्यता फेटाळल्या. आमच्या पक्षात सगळेच शांत असल्याचं त्यांनी सांगितलं. जयंत पाटील नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
अर्थमंत्री पद मिळणार का?
भाजपसोबत गेल्यानंतर अर्थमंत्री पदाची जबाबदारी जयंत पाटील यांच्याकडे सोपवली जाईल, अशी चर्चा सुरु आहे. याविषयी विचारले असता पाटील म्हणाले की, 'मी कशाचाच विचार केलेला नाही. तुम्ही माझ्यापेक्षा इतका पुढं का विचार करताय? एकतर मुख्यमंत्र्यांचा खातेवाटपाचा अधिकार आहे. तुम्ही तो हिरावून घ्यायला लागलेले आहात. तो त्यांचा अधिकार आहे. आणि माणूस गेला (भाजपसोबत) तर होईल ना? आम्ही सगळे राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या मागं सगळे आमदार, खासदार एकसंध आहोत. त्यामुळं मला हे बऱ्याचदा दु:ख वाटतं की वारंवार अशा चर्चा प्रसार माध्यमांतून का येताहेत?
हे ही वाचा : शरद पवार घड्याळ आतल्या बाजूने का घालतात? अंकशास्रज्ञाने सांगितलं लॉजिक
अजित पवार गटाविषयी काय म्हणाले?
राष्ट्रवादी अजित पवार गटातील कुरबुरींविषयी बोलताना ते म्हणाले की, 'मला दुसऱ्या पक्षावर बोलायचा मला काही अधिकार नाही. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. माझ्या पक्षात अंतर्गत कोणतीही घालमेल नाही. सगळे शांत आहेत. आणि आम्ही सगळे एकत्र आहोत. त्यामुळं दुसऱ्या पक्षांवर बोलणं योग्य नाही.'
हे ही वाचा : Personal Finance: सोन्याचे किंमती झाल्या कमी, आता सोने खरेदी करावे की पाहावी आणखी वाट?
'मी हो कसं म्हणू?'
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीविषयी बोलताना पाटील म्हणाले की, 'ते दोघंजण मला भेटले असते तर मी सांगितलं असतं की हो भेटले म्हणून. भेटच झाली नाही तर मी हो कसं म्हणू? त्यामुळं माझा काही त्यांच्याशी संपर्क होण्याचा प्रश्न यापूर्वीही नाही. सुप्रियाताईंच्या मुलीच्या लग्नात मात्र हे दोघंही आलेले होते. दोघांशीही स्वागत करत होतो त्यावेळी उभ्या-उभ्या भेट झाली.'
ADVERTISEMENT












