Maratha Reservation Protest : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाला आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यासंदर्भात आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बीडकर यांनी जरांगे पाटील यांच्या नावाने पत्र दिलं आहे. हे पत्र पाच ते सहा पानी असून, त्यामध्ये आंदोलनाला परवानगी नाकारण्यामागे 10 ते 11 कारणं नमूद करण्यात आली आहेत. गणेशोत्सवामुळे मुंबईत होणारी गर्दी, कायदा आणि सुव्यवस्था, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था आणि मागील वर्षी झालेल्या मराठा आंदोलनातील घडामोडींचा पोलिसांनी पत्रात उल्लेख केला आहे. तसेच जाहीर सभा, आंदोलने आणि मिरवणुकांसंदर्भातील 2025 मधील नियमांचं पालन होणार नसल्याची खात्री असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : वसई-विरारमध्ये आगमनादरम्यान ट्रॉली उलटली, दुर्घटनेत बाप्पांची मूर्ती कोसळली
पोलिसांनी मागच्या आंदोलनाची आठवण करुन दिली
पोलिसांनी दिलेल्या पत्रानुसार, मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथील सभेत मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याची घोषणा केली होती. आंदोलनासाठी एका दिवसाचीच परवानगी देण्याची तरतूद असल्याचं पोलिसांनी पत्रात नमूद केलं आहे. तसेच आंदोलनाची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत निश्चित असल्याचं सांगण्यात आलं आहे. मागील वर्षी दिलेल्या परवानगीच्या अटींचं पालन झालं नसल्याचाही पोलिसांचा दावा आहे. त्यावेळी आंदोलन सायंकाळी 6 वाजेपर्यंत स्थगित करणं अपेक्षित असताना ते पुढे सुरू राहिल्याचं पत्रात म्हटलं आहे. याशिवाय आंदोलनासाठी सुमारे 5 हजार किंवा त्यापेक्षा जास्त आंदोलक येणार असल्याचं अर्जात नमूद करण्यात आलं होतं. मात्र, मागील आंदोलनाच्या वेळी 5 हजार आंदोलकांची मर्यादा असताना सुमारे 40 हजार आंदोलक आझाद मैदान परिसरात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : मुंबईत सहा मांजरांसह एका पिल्लाला संपवलं, विखुरलेले आढळले मृतदेह
मागच्या आंदोलनावेळी 13 अदखलपात्र गुन्हे दाखल
वाहतूक व्यवस्थेचाही पोलिसांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. मागील वर्षी आंदोलनाच्या वेळी आंदोलकांची सुमारे 5 हजार चारचाकी वाहनं दक्षिण मुंबईतील विविध भागात आल्याचं पत्रात नमूद आहे. वाहनं ठरवून दिलेल्या पार्किंगच्या ठिकाणी उभी करण्याचे निर्देश असतानाही अनेक वाहनं मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये उभी करण्यात आली होती, असा पोलिसांचा दावा आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अडथळे निर्माण झाल्याचं पत्रात म्हटलं आहे. मागील आंदोलनादरम्यान सीएसएमटी, चर्चगेट, महापालिका मुख्यालय, हुतात्मा चौक, मेट्रो जंक्शन यांसह विविध ठिकाणी आंदोलकांनी मोर्चे काढले, रस्त्यावर बसून आंदोलन केलं आणि वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याचंही पोलिसांनी नमूद केलं आहे. या घटनांप्रकरणी दक्षिण विभागात 13 अदखलपात्र गुन्हे दाखल झाल्याचं पत्रात सांगण्यात आलं आहे.
सार्वजनिक आरोग्य, रुग्णालयं, न्यायालयीन कामकाज आणि दक्षिण मुंबईतील व्यापारावर परिणाम होण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे. मागील आंदोलनात रस्त्यावर अन्न शिजवणं, कचरा टाकणं आणि सार्वजनिक ठिकाणी आंघोळ करण्यासारख्या प्रकारांमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. आझाद मैदान परिसरातील जी.टी. रुग्णालय, मादाम कामा रुग्णालय, सेंट जॉर्ज रुग्णालय आणि बॉम्बे हॉस्पिटल यांसारख्या रुग्णालयांच्या सेवांवर परिणाम होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. न्यायालयीन कामकाज आणि क्रॉफर्ड मार्केट, झवेरी बाजार, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, आरबीआय यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांवरही परिणाम होऊ शकतो, असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यातच 14 सप्टेंबरपासून गणेशोत्सवामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने सार्वजनिक सुरक्षेच्या उपाययोजनांवर परिणाम होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या सर्व कारणांमुळे 19 सप्टेंबर 2026 पासून आझाद मैदान येथे आमरण उपोषण आणि आंदोलनासाठी मागितलेली परवानगी नाकारण्यात येत असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर यांनी पत्रात स्पष्ट केलं आहे. आता परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुढील काय भूमिका घेणार, मुंबईच्या दिशेने कूच करणार का आणि सरकार त्यांच्याशी पुन्हा चर्चा करणार का, याकडे लक्ष लागलं आहे.
ADVERTISEMENT












