मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) महाराष्ट्र पर्यटन विभागावर गंभीर आरोप केले आहेत. मनसेने गेल्या 13 वर्षांपासून शिवाजी पार्क मैदानावर आयोजित केलेल्या दीपोत्सव कार्यक्रमाबाबत पर्यटन विभागाने केलेल्या मार्केटिंगवरून नाराजी व्यक्त केली आहे. मनसेने म्हटले आहे की, पर्यटन विभागाने या दीपोत्सवाला आपणच आयोजित केल्यासारखे चित्र रंगवले आहे, जे अत्यंत आक्षेपार्ह आहे.
ADVERTISEMENT
पर्यटन विभागाचं 'ते' ट्वीट, मनसेचे गंभीर आरोप
मनसे अधिकृत हँडलने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "महाराष्ट्र पर्यटन विभागाने त्यांच्या एक्स हँडलवरून, मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरील 'दीपोत्सवाची' काही क्षणचित्रं दाखवून पुढे हा अनुभव घ्यायला या असं मुंबई आणि मुंबई बाहेरील पर्यटकांना आवाहन केलं आहे. दिवाळी हा हिंदूंचा सगळ्यात मोठा सण आणि या सणाच्या निमित्ताने गेली 13 वर्षे दीपोत्सव हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवाजी पार्क मैदानावर करत आहे. हा दीपोत्सव जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत असली तरी तो पूर्ण अराजकीय राहील हे आम्ही पाहिलं आणि आमचा उद्देश फक्त आणि फक्त लोकांना आनंद मिळावा हाच आहे आणि राहील."
हे ही वाचा>> राज ठाकरेंकडून पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', पीएम मोदी अन् शिंदेंच्या आमदारांचे व्हिडीओ दाखवले, निवडणूक आयोगाला घेरलं
मनसेने पुढे म्हटले आहे की, "पण जेव्हा महाराष्ट्र सरकारचा एक विभाग या दीपोत्सवाचं मार्केटिंग हे स्वतः हा विभाग करत असल्यासारखं जेव्हा दाखवतं तेव्हा विशेष आश्चर्य वाटलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याचं अगदी छोटंसं श्रेय दिलं असतं तर निश्चित आम्हाला आनंद झाला असता आणि सरकारच्या मनाचा उमदेपणा दिसला असता."
मनसेने नाशिकमध्येही आपण केलेल्या उपक्रमांबाबत असेच अनुभव आल्याचे सांगितले. "नाशिकमध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे केलं ते पुढे तत्कालीन सरकारनेच केलं अशी जाहिरातबाजी झाली. असो.. पण तुमचे नेते ते आमचे नेते, तुमचा पक्ष आमचा पक्ष अशी कार्यपद्धती सत्ताधारी पक्षाची आहे हे दिसतंच आहे. पण आता दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रम सुद्धा आपलेच आहेत हे दाखवण्यापर्यंत सरकार जाईल असे वाटले नव्हते," असे मनसेने म्हटले आहे.
हे ही वाचा>> "त्यावेळेस दोनदा मरता-मरता वाचलो", धनंजय मुंडे असं का म्हणाले?
मनसेने आपल्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमांबाबतही पर्यटन विभागाला इशारा दिला आहे. "आम्ही मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने एक अभिजात कार्यक्रम यावर्षी केला, दीपोत्सव तर असतोच, असे सामान्यांना आनंद देणारे अनेक उपक्रम आम्ही करत राहणार आहोतच. त्यावेळी देखील पर्यटन विभागाला ते आमचे आहेत म्हणण्याचा मोह होईल इतके ते छान करूच, फक्त त्यावेळेस त्याचं श्रेय आमच्या पक्षाला जरूर द्या म्हणजे झालं," असे मनसेने म्हटले आहे.
या प्रकरणी अद्याप महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून आता मनसेने केलेल्या टीकेबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तसंच सरकारच्या वतीने देखील यावर काही भाष्य करण्यात आलेलं नाही.
ADVERTISEMENT
