बदलापूर : बदलापुरातील एका परप्रांतीय फेरीवाल्याला मनसैनिकांनी बेदम चोप दिल्याची घटना घडलीय. या परप्रांतीय फेरीवाल्याने मराठी भाषेबद्दल आणि माणसांबद्दल अपशब्द वापरले होते. या फेरीवाल्यावर पालिकेकडून कारवाई केली जात असताना त्याने मराठी भाषेबद्दल आणि मराठी माणसाबद्दल शिवीगाळ करत अपशब्द वापरले. दरम्यान याची माहिती बदलापुरातील मनसैनिकांना मिळाल्यानंतर त्यांनी या परप्रांतीय फेरीवाल्याला बेदम चोप दिलाय. दरम्यान मारहाणीनंतर फेरीवाल्यानी हात जोडून घटनेबद्दल माफी मागितली. सध्या पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. बदलापूर पश्चिमेच्या स्टेशन भागात बसणारा हा फेरीवाला आहे.
ADVERTISEMENT
"पोलिसांना अशा लोकांना नियंत्रित करावं, अन्यथा मनसैनिक रस्त्यावर उतरतील"
याबाबत बोलताना मनसेच्या महिला पदाधिकारी सरिता चेंदरकर म्हणाल्या, बदलापूर पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी मार्केट परिसरात अतिक्रमण हटवत होते. त्यावेळी उत्तर भारतीय फेरीवाला त्यांना मारहाण करण्यासाठी अंगावर धावून आला. त्यानंतर त्याने मराठी भाषेला आणि मराठी माणसाला शिवीगाळ केली. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरले. आम्ही त्याला चोप देखील दिलेला आहे. त्याने माफी देखील मागितलेली आहे. मात्र, बदलापूर शहरात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये. यासाठी पूर्व बदलापूर पोलिसांना मी विनंती करते. त्यांनी या बारीक गोष्टीवरती लक्ष ठेवायला हवं. अन्यथा महाराष्ट्र सैनिक मराठी माणसासाठी रस्त्यावर उतरतील. भविष्यात असा प्रकार होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने यावर बारीक लक्ष ठेवावं.
हेही वाचा : लोकसभेला उभे राहिले, गावाने लीड अन् निधी दिला; पण नंतर कधी फिरकलेच नाहीत, सदाभाऊ खोतांना शेतकऱ्यांनी अडवलं
दरम्यान, गेल्या काही वर्षात मुंबईत मराठी विरुद्ध अमराठी हा संघर्ष वाढताना दिसतोय. विशेष म्हणजे याभोवती मुंबईतील राजकारण देखील फिरत आलं आहे. यापूर्वी देखील मनसैनिकांनी सातत्याने अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सातत्याने मुंबईतील उत्तर भारतीयांना त्यांच्या चुकीच्या वागण्याबाबत इशारा देखील दिला होता.
हेही वाचा : आम्हाला खाज होती म्हणून माळेगाव कारखान्याचा चेअरमन झालो, अजित पवारांचं वक्तव्य; कोणाला दिला इशारा?
ADVERTISEMENT
