लोकसभेला उभे राहिले, गावाने लीड अन् निधी दिला; पण नंतर कधी फिरकलेच नाहीत, सदाभाऊ खोतांना शेतकऱ्यांनी अडवलं
Sadabhau Khot : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सोलापुरातल्या माढा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सदाभाऊ खोत यांना अडवलं

लोकसभेला लीड देऊनही नंतर कधी गावात का आले नाहीत? असा सवाल शेतकऱ्यांनी केला
Sadabhau Khot and Solapur Flood 2025 : गेल्या 15 दिवसांपासून मराठवाड्यासह सोलापुरात जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. पावसामुळे शेतकऱ्यांची पीकं काळी पडली असून बळीराजा हवालदिल झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही मंत्र्यांनी सोलापुरात जाऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सीना नदीला महापूर आल्यानंतर माढा तालुक्यातील उंदरगाव,दारफळ आदी गावांना जबरदस्त फटका बसला आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते व विधानपरिषद सदस्य सदाभाऊ खोत शनिवारी उंदरगाव येथे पूरग्रस्त शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गेले असता,स्थानिक शेतकऱ्यांच्या जबरदस्त संतापाला सामोरे जावे लागले,शेतकऱ्यांनी सदाभाऊ खोत यांचं कडाडून विरोध केला.
शेतकरी काय म्हणाले?
आम्ही तुम्हाला 25 हजार निधी दिला. तुमच्या गळ्यात 5-5 हजारांच्या माळा घातल्या. या गावाने तुमच्या प्रेम केलं. निवडणुकीत या गावाने तुम्हाला लीड दिला. मात्र, त्यानंतर तुम्ही आजपर्यंत आमच्या गावात आला नाहीत. याचं उत्तर द्या, असं शेतकरी म्हणाले. शेतकरी संघटनेच्या काही जुन्या कार्यकर्त्यांनी थेट सदाभाऊ खोतांना चँलेंज दिलं. एवढ्या उशिरा पाहणी करण्यास आलात का? सरकारची नव्हे तर शेतकऱ्यांची बाजू मांडा अशा शब्दात शेतकऱ्यांनी सदाभाऊ खोतांना फटकारलं.
दरम्यान, यासंदर्भात सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सदाभाऊ खोत म्हणाले, सदाभाऊ खोत म्हणाले मी 2014 साली याच मतदारसंघातून खासदरकी लढवली होती. मग सोळा वर्षे कसले? शेतकऱ्यांचा संताप कबूल आहे. मात्र मी माढ्यात सोळा वर्षानंतर गेलो नाही तर 2014 च्या निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघातुन निवडणूक लढवली आहे.2014 ते 2025 सोळा वर्षे होतात का ?असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला आहे. 2021 मध्ये याच माढा तालुक्यात मी मोठा शेतकरी मेळावा घेतला होता, असंही खोत यांनी स्पष्ट केलं.
राज्य सरकार कडून 3400 रुपये तात्पुरते; दिवाळीपर्यंत भरघोस मदत मिळेल
राज्य सरकारने तातडीने 2215 कोटी रुपयांची निधी दिला आहे. एकरी 3400 रुपये म्हटले जात आहे. मात्र ही मदत तातडीची मदत आहे दिवाळीपर्यंत राज्यातील महायुती सरकार शेतकऱ्यांना हेक्टरी प्रमाणे भरघोस मदत करणार आहे,असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला आहे.