पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असून आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमणवार यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी लावून धरली आहे. गांजवे चौकाजवळील लाल बहादूर शास्त्री रोड परिसरात एस. एम. जोशी पुलाजवळ विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनात कोल्हापूरचा विद्यार्थी विवेकानंद पाटील याची भाषणं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहेत. विद्यार्थ्यांमध्ये एकजूट निर्माण करण्यासाठी विवेकानंद सातत्याने भाषण करत असल्याचं त्याने सांगितलं. याच पार्श्वभूमीवर मुंबई Tak ने विवेकानंद पाटील यांच्याशी संवाद साधला. आंदोलनामागच्या मागण्या, परीक्षा पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या भूमिकेबाबत त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.
ADVERTISEMENT
हेही वाचा : नेत्यांनाही बोलायला जमत नाही असं दोन-दोन तास बोलणाऱ्या विवेकानंद पाटीलचं भाषण
'परीक्षा पद्धतीबाबत वारंवार निर्णय बदलले जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम'
विवेकानंद पाटील यांच्या म्हणण्यानुसार, आंदोलनाचा मुख्य उद्देश MPSC अध्यक्ष विवेक भीमणवार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी हा आहे. यासोबतच 70 ते 80 हजार पदांची मेगा भरती करण्याची मागणीही विद्यार्थ्यांची आहे. सरकारकडून अध्यक्षांवर कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं जात असलं, तरी नैतिक जबाबदारी स्वीकारून अध्यक्षांनी स्वतः राजीनामा द्यावा, अशी विद्यार्थ्यांची भूमिका असल्याचं विवेकानंद यांनी सांगितलं. त्यांच्या मते, परीक्षा पद्धत ऑब्जेक्टिव्ह असावी की डिस्क्रिप्टिव्ह, हा मुख्य मुद्दा नसून परीक्षा पारदर्शक आणि प्रामाणिक पद्धतीने होणं महत्त्वाचं आहे. परीक्षा पद्धतीबाबत वारंवार निर्णय बदलले जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, असा आरोपही त्यांनी केला.
'विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष देऊन स्वतः आंदोलनस्थळी यावं'
आंदोलनात फूट पडल्याचं सरकारकडून भासवलं जात असल्याचा दावा विवेकानंद यांनी केला. वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनांमध्ये परीक्षा पद्धतीबाबत वेगवेगळ्या मागण्या असल्या तरी आपल्या आंदोलनाची मुख्य मागणी अध्यक्षांच्या राजीनाम्याचीच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आपल्या आंदोलनाला परवानगी देण्यात आली नसताना इतर आंदोलनांना परवानगी देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच सत्ताधारी आणि विरोधकांकडून आंदोलनाकडे वेगवेगळ्या पद्धतीने पाहिलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यांच्या आंदोलनाला आमदार रोहित पवार यांच्यासह विरोधी पक्षातील काही नेत्यांचा पाठिंबा आहे. मात्र, हे विद्यार्थ्यांचं आंदोलन असून राजकीय आंदोलन नसल्याचं विवेकानंद यांनी स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष देऊन स्वतः आंदोलनस्थळी यावं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
विवेकानंद यांनी सांगितलं की, ते MPSC आणि UPSC या दोन्ही परीक्षांचा अभ्यास करतात. त्यांच्या भाषणांमागे वाचनाची सवय महत्त्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स आणि इंडियन एक्सप्रेस ही वृत्तपत्रं ते वाचतात. तसेच विविध पुस्तकांचं वाचन आणि व्याख्यानं ऐकण्याची सवय असल्याचं त्यांनी सांगितलं. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील माजगाव येथे जिल्हा परिषद शाळेत त्यांचं शिक्षण झालं. त्यानंतर कला शाखेतून शिक्षण घेत त्यांनी राज्यशास्त्राची पदवी घेतली असून शिवाजी विद्यापीठात ते पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी शेतकरी असल्याचं त्यांनी सांगितलं. भीमनवार यांचा राजीनामा झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी पुन्हा स्पष्ट केली. सरकारने सचिवांची बदली, ऑफलाइन परीक्षा आणि जागावाढीच्या भरतीबाबत निर्णय घेतला असला तरी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं विवेकानंद यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT












