CJP Protest: 'ग्यानू काका राजीनामा द्या.. राजीनामा द्या...', शिवाजी पार्कवर जोरदार घोषणाबाजी

मुंबई तक

• 05:03 PM • 02 Oct 2026

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJPच्या आंदोलकांनी शिवाजी पार्कवर जोरदार आंदोलन करत “ग्यानू काका राजीनामा द्या” अशा घोषणा दिल्या.

cjp shivaji park protest cec gyanesh kumar resignation mumbai

CJP Protest

Google CTA

मुंबई: “ग्यानू काका राजीनामा द्या... राजीनामा द्या...” अशा जोरदार घोषणांनी गांधी जयंतीच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्क परिसर दणाणून गेला. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टी (CJP) कडून आंदोलनाची हाक देण्यात आली होती. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली असतानाही CJPच्या आंदोलकांनी शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

हे वाचलं का?

या आंदोलनादरम्यान CJPच्या कार्यकर्त्यांकडून निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. नव्या मतदारांच्या नोंदणीचा मुद्दाही आंदोलकांनी उपस्थित केला. फॉर्म 6 मुळे नव्या मतदारांची नोंदणी होत नसल्याचा आरोप CJPच्या आंदोलकांनी केला. तसेच, सरकार Gen Z म्हणजेच तरुण मतदारांना घाबरत असल्याचा दावाही आंदोलकांकडून करण्यात आला.

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी

CJPचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. CJPच्या आंदोलनाची सुरुवात मुंबईतील शिवाजी पार्कपासून करून पुढे देशातील इतर शहरांमध्ये आंदोलन नेण्याची घोषणा करण्यात आली आहे. आंदोलन ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देईपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्धार दीपके यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा>> CJP Protest LIVE : सीजेपीच्या आंदोलनात देशभक्तीपर गीते, गांधी-आंबेडकरांच्या नावाने घोषणाबाजी

CJPने निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता असावी, अशी मागणीही केली आहे. पुढील मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती पारदर्शक पद्धतीने व्हावी आणि या प्रक्रियेत नागरी समाजाचा सहभाग असावा, अशी भूमिका अभिजीत दीपके यांनी मांडली आहे.

शिवाजी पार्क परिसरात मोठा बंदोबस्त

दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क आणि दादर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवाजी पार्ककडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. दादर रेल्वे स्थानक आणि शिवाजी पार्क परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली.

हे ही वाचा>> ज्ञानेश कुमारांना हटवणं एवढं सोप्पं आहे का? प्रक्रिया एकदा पाहा!

पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्याचं यापूर्वीच स्पष्ट झालं होतं. शिवाजी पार्क परिसरातील शांतता क्षेत्राबाबतच्या नियमांचा आणि वाहतूक व्यवस्थेचा विचार करून आंदोलनासाठी पर्यायी ठिकाण म्हणून आझाद मैदानाचा पर्याय देण्यात आल्याचंही समोर आलं होतं. मात्र, CJPने शिवाजी पार्क येथेच आंदोलन करण्याचा निर्णय कायम ठेवला.

स्थानिक रहिवाशांचा आंदोलनाला विरोध

या आंदोलनाला शिवाजी पार्क परिसरातील काही स्थानिक रहिवाशांनीही विरोध केला. आंदोलनामुळे परिसरातील शांतता आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याची नाराजी स्थानिकांनी व्यक्त केली. निवासी परिसरात अशा प्रकारचं आंदोलन आयोजित करू नये, अशी भूमिका काही रहिवाशांनी मांडली.

दरम्यान, CJPचे संयोजक अभिजीत दीपके यांनी गांधी जयंतीनिमित्त दक्षिण मुंबईतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली. त्यानंतर शिवाजी पार्क येथे आंदोलनाची हाक देण्यात आली. CJPने मुंबईनंतर देशातील इतर शहरांमध्येही आंदोलन नेण्याची घोषणा केली आहे.

या संपूर्ण आंदोलनामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची CJPची मागणी आणि निवडणूक प्रक्रियेबाबत उपस्थित केलेले प्रश्न पुन्हा चर्चेत आले आहेत. CJPकडून मांडण्यात आलेले मत आणि आरोप हे त्या संघटनेचे दावे आहेत. निवडणूक आयोगाची संबंधित भूमिका स्वतंत्रपणे विचारात घेणे आवश्यक आहे.