मनीष जोग, जळगाव: स्व. अजित पवार यांच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी जळगावात मोठा दावा केला आहे. अजित पवारांच्या अपघातामागे घातपाताची शक्यता असल्याचा संशय व्यक्त करत, व्हीएसआर कंपनीच्या मालकाला वाचवणाऱ्या एका मोठ्या नेत्याचा पर्दाफाश करणार असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, हा नेता केंद्रातील नसून महाराष्ट्रातीलच असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
रोहित पवार सध्या चाळीसगाव तालुक्यातील दुष्काळ आणि पाणी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अजित पवारांच्या अपघातासंदर्भात हा गंभीर दावा केला. संबंधित नेत्याचे नाव, त्याचा फोटो आणि त्यासंदर्भातील पुरावे आपण समोर आणणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘मफलरवाला’ नेता कोण?
रोहित पवार यांनी आपल्या दाव्यात एका ‘मफलरवाला नेत्याचा’ उल्लेख केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, एका कार्यक्रमात एका मोठ्या नेत्याने विशिष्ट प्रकारचा मफलर घातला होता. हा कार्यक्रम नेमका कोणता होता आणि त्यासंदर्भातील माहिती काय आहे, याचा खुलासा आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा>> मिळालेला जामीन गमावला, डॉक्टरला मारहाण करणारे शिंदेंचे नगरसेवक रमेश म्हात्रेंसोबत सुप्रीम कोर्टात काय घडलं? आता पुन्हा तुरुंगात!
रोहित पवार यांच्या दाव्यानुसार, व्हीएसआर कंपनीला आतापर्यंत याच नेत्याने वाचवल्याचा त्यांना संशय आहे. तसेच, अजित पवारांचा अपघात नसून घातपात झाला असावा, असे ज्यांच्याबाबत वाटते, अशा लोकांना जर कोणी वाचवत असेल, तर त्या व्यक्तीचे नावही समोर आणले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
10 तारखेला नाव आणि पुरावे जाहीर करणार
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठा खुलासा १० तारखेला करण्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. सकाळी 10 ते 11 वाजण्याच्या दरम्यान संबंधित नेत्याचे नाव जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा>> 'सभेला गर्दी होते मग मतं कुठे जातात?' ज्ञानेश कुमारांचा दाखला देत राज ठाकरेंचे जोरदार प्रत्युत्तर
केवळ नावच नाही, तर संबंधित व्यक्तीचा फोटो आणि पुरावेही लोकांसमोर आणणार असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे 10 तारखेला होणाऱ्या या कथित खुलाशाकडे लक्ष लागले आहे.
काही जिल्ह्यांचा दौरा बाकी
रोहित पवार यांनी सांगितले की, त्यांचा काही जिल्ह्यांचा दौरा अद्याप बाकी आहे. हा दौरा पूर्ण झाल्यानंतर 10 तारखेनंतर नाशिक किंवा मुंबईत पत्रकार परिषद घेण्यात येईल. याच पत्रकार परिषदेत ‘मफलरवाला नेता’ कोण आहे, त्याचे नाव काय आहे आणि त्याच्याविरोधात कोणते पुरावे आहेत, याबाबत माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, रोहित पवार यांनी केलेल्या या दाव्यांमुळे अजित पवारांच्या अपघाताचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र, संबंधित नेत्याचे नाव आणि कथित पुरावे अद्याप सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत. 10 तारखेला रोहित पवार नेमका कोणता खुलासा करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT












