नेत्यांनाही बोलायला जमत नाही असं दोन-दोन तास बोलणाऱ्या विवेकानंद पाटीलचं भाषण

मुंबई तक

• 08:15 AM • 04 Oct 2026

MPSC च्या विद्यार्थ्यांचं पुण्यात अध्यक्ष विवेक भीमणवार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरु आहे. तसेच इतरही काही वेगळ्या मागण्या आहेत. गांजवे चौकात विद्यार्थी आंदोलनास बसले आहेत. यात तरुण विद्यार्थी विवेकानंद पाटील याचं भाषण सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे.

MPSC Student Protest Pune

MPSC Student Protest Pune

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पुण्यात एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन

point

विवेकानंद पाटीलचं भाषण तुफान व्हायरल

MPSC Student Protest Pune : पुणे सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षार्थींच्या आंदोलनाने ढवळून निघाला आहे. MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मुख्य मागणी करत विद्यार्थ्यांनी हे आंदोलन छेडले असून, 70 हजार पदांची मेगा भरती, कृषी सेवा 2024 परीक्षेचे रिचेकिंग आणि 2019 पासून रखडलेली महावितरण भरती यांसारख्या प्रमुख मागण्याही लावून धरल्या आहेत. या आंदोलनाला विविध राजकीय नेत्यांनी भेटी देत पाठिंबा दर्शवला आहे, तर दुसरीकडे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे.

हे वाचलं का?

आयोगाच्या कारभारावर ताशेरे

याच आंदोलनादरम्यान तरुण विद्यार्थी विवेकानंद पाटील याचे अत्यंत आवेशपूर्ण आणि तडाखेबंद भाषण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. आपल्या खास ग्रामीण आणि कोल्हापुरी लहेजातील शैलीत भाष्य करताना त्याने आयोगाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. "आम्ही शेतकरी आणि गोरगरिबांची पोरं आहोत, 50-50 लाख रुपये देऊन वशिल्याने नोकऱ्या विकत घेण्याची आमची कुवत नाही," असे सांगत त्याने दिवस-रात्र अभ्यास करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भावनांना वाट करून दिली. तसेच, MPSC, NEET आणि NET-SET च्या पेपरफुटीवरून सरकार आणि आयोगाच्या नैतिकतेवर थेट सवाल उपस्थित केले.

हे ही वाचा : ग्यानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आज ठाकरे बंधूंचा एल्गार! राज-उद्धव ठाकरे एकत्र, मुंबईत महामोर्चा

'आंदोलनात फूट पडलेली नाही'

भाषणात बोलताना विवेकानंद पाटील याने MPSC आंदोलनात फूट पडल्याच्या सर्व बातम्या फेटाळून लावल्या. "आंदोलनात कसलीही फूट पडलेली नाही, चांद्यापासून बांध्यापर्यंत सर्व विद्यार्थी एकत्र आहेत आणि अध्यक्षांचा राजीनामा होईपर्यंत हा लढा शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने सुरूच राहील," असा निर्धार त्याने व्यक्त केला. या आंदोलनाला रोहित पवार, विश्वजीत कदम आणि इतर प्रमुख नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला असून, विद्यार्थ्यांनीही पोलीस आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन वक्त्याने आपल्या भाषणातून केले.

हे ही वाचा : Maharashtra Weather : जवळ जवळ अर्ध्या राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज

'उजेड शोधायला बाहेर पडलेली माणसं'

आयोगाकडून विद्यार्थ्यांना 'डिबार' करण्याच्या मिळणाऱ्या धमक्यांना उत्तर देताना त्याने स्वतःचे नाव जाहीरपणे सांगत आयोगाला थेट आव्हान दिले. "आम्ही उजेड शोधायला बाहेर पडलेली माणसं आहोत, पण व्यवस्थेने आमच्या वाट्याला अंधार आणला आहे," अशा काव्यमय संदर्भांचा वापर करत त्याने उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह भरला. आयोगाचे अध्यक्ष आणि प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तात्काळ राजीनामा द्यावा आणि सुशासनाचे (Good Governance) पालन करावे, अशी आक्रमक मागणी या भाषणातून करण्यात आली आहे.