कॉकरोच जनता पार्टीला शिवाजी पार्कवर आंदोलन करण्याची परवानगी का नाकारली?

मुंबई तक

29 Sep 2026 (अपडेटेड: 29 Sep 2026, 08:21 AM)

mumbai cjp protest : मुंबईत 2 ऑक्टोबरला CJPकडून शिवाजी पार्कमध्ये आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली असून त्यामागची कारणे काय आहेत, जाणून घ्या.

Abhijeet Dipke

Abhijeet Dipke

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

कॉकरोच जनता पार्टीला शिवाजी पार्कवर आंदोलन करण्याची परवानगी का नाकारली?

point

मोर्चासाठी शिवाजी पार्कात शिंदेंना परवानगी पण दीपकेंना का नाही? अट पाहा

mumbai cjp protest : मुंबईत 2 ऑक्टोबरला कॉक्रोच जनता पक्षाच्या (CJP) वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. CJPचे राष्ट्रीय संघटक प्रमुख अजिंक्य शिंदे यांनी शिवाजी पार्क येथे दुपारी 3 ते रात्री 9 या वेळेत आंदोलनासाठी परवानगी मागितली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. यानंतर CJPचे अभिजीत दीपके यांनी पोलिसांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत एकनाथ शिंदे यांना शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्याची परवानगी कशी मिळाली? असा सवाल केला आहे. मात्र, मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारताना मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आणि राज्य सरकारच्या शासन निर्णयाचा दाखला दिला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : गर्भवती नर्तिकेला मृत समजून जंगलात जिवंत जाळले, कलाकेंद्रातील वादाचा भयंकर शेवट!

मैदानाचा वापर खेळाव्यतिरिक्त इतर कारणांसाठी करण्यावर निर्बंध

मुंबई पोलिसांच्या उत्तरानुसार, मुंबई उच्च न्यायालयाने 4 जानेवारी 2013 रोजी दिलेल्या आदेशानुसार शिवाजी पार्क मैदानाचा वापर खेळाव्यतिरिक्त इतर कारणांसाठी करण्यावर निर्बंध आहेत. त्याचबरोबर 2016 मध्ये तत्कालीन फडणवीस सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आधारे शासन निर्णय काढला होता. त्यानुसार शिवाजी पार्क मैदानाचा वापर वर्षातून 45 दिवस खेळाव्यतिरिक्त काही ठराविक कार्यक्रमांसाठी करता येतो. मात्र, त्यासाठी संबंधित परवानगी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. CJPने मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितली असली तरी मुंबई महानगरपालिकेची परवानगी असल्याची प्रत अर्जासोबत जोडलेली नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे शिवाजी पार्कमध्ये आंदोलनासाठी परवानगी देण्याचा अधिकार मुंबई पोलिसांकडे नसल्याचे त्यांच्या उत्तरातून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा : मिळालेला जामीन गमावला, डॉक्टरला मारहाण करणारे शिंदेंचे नगरसेवक रमेश म्हात्रेंसोबत सुप्रीम कोर्टात काय घडलं? आता पुन्हा तुरुंगात!

शिवाजी पार्क मैदान वर्षातून 45 दिवस विविध कार्यक्रमांसाठी राखीव

शासन निर्णयानुसार शिवाजी पार्क मैदान वर्षातून 45 दिवस विविध कार्यक्रमांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, राष्ट्रीय नेत्यांच्या जयंती आणि पुण्यतिथी, सार्वजनिक सभा आणि धार्मिक कार्यक्रमांचा समावेश आहे. याशिवाय 2013 च्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बालदिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्य दिन, गणेश विसर्जन, दसरा मेळावा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनासाठी एकूण 34 दिवस निश्चित करण्यात आले आहेत. उर्वरित 11 दिवसांपैकी काही दिवस विविध कार्यक्रमांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. दसरा मेळाव्यासाठीही शिवाजी पार्क मैदानाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ठराविक दिवसांमध्ये आणि संबंधित परवानग्या घेतल्यानंतर शिवाजी पार्कमध्ये राजकीय किंवा अन्य कार्यक्रम होऊ शकतात.

मुंबई पोलिसांनी CJPच्या आंदोलनाला परवानगी नाकारताना आणखी काही कारणेही दिली आहेत. शिवाजी पार्क परिसर शांतता क्षेत्र आणि निवासी क्षेत्र असल्याने आंदोलनामुळे ध्वनी प्रदूषण होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच आंदोलनामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ शकते आणि जवळच्या रुग्णालयांमध्ये ये-जा करणाऱ्या रुग्णांना त्याचा परिणाम होऊ शकतो, असेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे CJPच्या 2 ऑक्टोबरच्या आंदोलनासाठी पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. दुसरीकडे, शिवाजी पार्कमध्ये ठराविक दिवसांसाठी सार्वजनिक सभा आणि इतर कार्यक्रमांना शासन निर्णयानुसार परवानगीची तरतूद असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे CJPच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यामागे मुंबई महानगरपालिकेची परवानगी नसणे आणि मुंबई पोलिसांना अशा कार्यक्रमासाठी स्वतंत्रपणे परवानगी देण्याचा अधिकार नसणे हे प्रमुख कारण असल्याचे पोलिसांच्या उत्तरातून समोर आले आहे.