मुंबई: राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या मतदानाच्या 48 तास आधी निवडणूक आयोगाने 20 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायती तसेच 154 सदस्यांच्या निवडणुका या पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज (2 डिसेंबर) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ऐन मतदान सुरू असताना एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. उर्वरित नगर परिषदांचे मतदान जोवर पार पडत नाही तोवर आज होणाऱ्या मतदानाची मतमोजणी ही करू नये. म्हणजे जी मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार होती ती आता थेट 21 डिसेंबर रोजी होणार आहे. पण याच सगळ्याबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री सलग दोन दिवस आपली नाराजी व्यक्त केली आहे. काल (1 डिसेंबर) निवडणूक पुढे ढकलण्याच्या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर आज कोर्टाने दिलेल्या निकालावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कोर्टाने मतमोजणी पुढे ढकलली, पाहा फडणवीस का झाले नाराज
'मी अद्याप निकाल वाचलेला नाही. पण हा निकाल जर खंडपीठाने दिला असेल तर तो सर्वांना मान्यच करावा लागेल. पण आता जवळपास 25-30 वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतोय. पण असं पहिल्यांदा घडतंय की, घोषित केलेल्या निवडणुका पुढे चालल्या आहेत, त्याचे निकाल पुढे चालले आहेत. मला असं वाटतं की, एकूणच ही जी काही पद्धत आहे ती फार काही योग्य वाटत नाही.'
हे ही वाचा>> मोठी बातमी: नगर परिषद, नगर पंचायतींची मतमोजणी उद्या नाही, तर... हायकोर्टाचा सर्वात मोठा निर्णय!
'खंडपीठ स्वायत्त आहे. त्यांनी दिलेला निकाल सर्वांना मान्य करावा लागेल. निवडणूक आयोगही स्वायत्त आहे. पण यातून जे उमेदवार आहे जे मेहनत करतात.. इतके दिवस प्रचार करतात त्या सगळ्यांचा एक प्रकारे भ्रमनिरास होतो.'
'सिस्टिमच्या फेल्युअरमुळे उमेदवारांची काही चूक नसताना त्याठिकाणी या सगळ्या अशा गोष्टी घडणं काही योग्य नाही. मला असं वाटतं खूप निवडणुका निवडणूक आयोगाला घ्यायच्या आहेत. या सगळ्या प्रक्रियेत आयोगाने सुधारणा आणल्या पाहिजे आणि किमान पुढच्या निवडणुकांमध्ये असं होणार नाही असं निवडणूक आयोगाने बघितलं पाहिजे असं माझं मत आहे.'
'माझं मत असं आहे की, मी चूक म्हणणार नाही पण जो काही कायदा आहे त्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. निवडणूक आयोगाचे वकील कोण आहेत ते मला माहीत नाही. मी पूर्णपणे आदर राखून म्हणतोय की, अतिशय चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. कारण इतके वर्ष या निवडणुका आम्हीही लढवतो आहोत. त्याचे नियम आम्हीही पाहिले आहेत. मीही अनेक वकिलांशी त्यासंबंधी सल्ला मसलत केली आहे. त्यामुळे माझं मत आहे की, हा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे.'
हे ही वाचा>> Nagar Parishad Voting LIVE: नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदानाला सुरूवात, 'या' जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी किती?
'पुन्हा एकदा सांगतो की, ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी योग्य रित्या पार पडल्या आहेत अशा ठिकाणी कोणीतरी कोर्टात गेलं.. कोर्टाने त्याला दिलासाही दिला नाही. पण तो केवळ कोर्टात गेला म्हणून निवडणुका पुढे नेणं हे कोणत्याही तत्वात बसत नाही. हे अतिशय चुकीचं घडलेलं आहे.'
'या संदर्भात माझी वैयक्तिक नाराजी मी काल देखील जाहीर केली आहे आणि ती कायद्यावर आधारित आहे. माझी काही निवडणूक आयोगावर नाराजी नाही.'
'केवळ 24 ठिकाणी मतदान व्हायचंय म्हणून सरसकट सगळीकडची मतमोजणी पुढे ढकलणं हे मला तरी योग्य वाटत नाही. पण त्यावर यापेक्षा अधिक मी काही बोलणार नाही.' असं म्हणत फडणवीसांनी त्यांनी नाराजी स्पष्टपणे जाहीर केली.
ADVERTISEMENT











