Uddhav Thackeray : डिलिमिटेशन विधेयकावरून देशातील राजकीय वातावरण तापले असताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. डिलिमिटेशन म्हणजे उघडउघड मतचोरीचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. मी पक्षहितापेक्षा महाराष्ट्र आणि देशाचं हित अधिक महत्त्वाचं मानतो, असं सांगत त्यांनी या विधेयकाला विरोध दर्शवला. शरद पवार यांनीही याबाबत विचार करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार लक्षात घेऊन लोकशाही वाचवण्याची वेळ आली आहे. लोकशाहीचा गळा घोटल्यानंतर अश्रू ढाळून काही उपयोग होणार नाही, असं म्हणत त्यांनी एम. के. स्टॅलिन यांनाही या भूमिकेचा पुनर्विचार करण्याचं आवाहन केलं.
ADVERTISEMENT
'देशाला गंभीर परिणाम भोगावे लागतील'
डिलिमिटेशन समितीवरही उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले. मतचोरीचा आरोप असलेल्या लोकांना या समितीत स्थान देण्यात आलं आहे. मतचोरी करणाऱ्या ज्ञानेश कुमार यांना समितीवर ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला. लोकसभेच्या जागा वाढल्यानंतर राज्यसभेच्या जागाही वाढणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र देशाला मोठ्या प्रमाणात कर देतो, मात्र त्या तुलनेत राज्याला पुरेसा परतावा मिळत नाही, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. डिलिमिटेशन विधेयक मंजूर झाल्यास देशाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
हे ही वाचा : विमानात बसण्याआधी राहुल गांधींचं DMK ला साकडं, स्टॅलिन यांच्या रिप्लायची जोरदार चर्चा!
'भाजप महिलांची फसवणूक करतोय'
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी महिला आरक्षण विधेयकाला आपला पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, लोकसभेच्या सध्याच्या 543 जागांमध्येच महिलांना आरक्षण द्यावं, अशी मागणी त्यांनी केली. केवळ महिला आरक्षण विधेयक आणलं, तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ, असंही ते म्हणाले. महिलांच्या नावाखाली भाजप देशाची आणि महिलांची फसवणूक करत असल्याचा आरोप करत त्यांनी या मुद्द्यावरून भाजपवर टीका केली. महिलांच्या नावावर घाणेरडं राजकारण केलं जात असल्याचंही ते म्हणाले.
हे ही वाचा : डिलिमिटेशनविरोधात सोनिया गांधी मैदानात, स्टॅलिन-पवारांना भेटणार; भाजपचं टेन्शन वाढणार?
'भविष्यात कचऱ्याची पेटी मिळेल'
दरम्यान, खासदारांना पक्षहितापेक्षा देशहिताला प्राधान्य देण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. सत्ताधाऱ्यांकडून सध्या खोके मिळतील; मात्र भविष्यात कचऱ्याची पेटी मिळेल, असा टोला त्यांनी लगावला. शिवसेनेच्या नऊ खासदारांना यासंदर्भात पक्षादेश दिल्याची माहितीही त्यांनी दिली. डिलिमिटेशनची रंगीत तालीम मुंबई महानगरपालिकेत झाली असल्याचा आरोप करत खासदारांची संख्या वाढल्यानंतर त्यांच्या खर्चाचा भार कोण उचलणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
ADVERTISEMENT












