वरिष्ठांचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी निरोप, संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आपल्याच उमेदवाराला घरात कोंडलं

Nagpur Mahanagar Palika Election 2026 : भाजपाचे पदाधिकारी किसन गावंडे यांनी प्रभाग 13-ड मधून बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सुरुवातीला पक्षाकडून त्यांच्या नावाला हिरवा कंदील मिळाल्याचं चित्र होतं. मात्र, शेवटच्या टप्प्यात पक्षाने अचानक भूमिका बदलत गावंडे यांना अर्ज माघारी घेण्याचा आदेश दिला. हा आदेश मिळताच गावंडे यांनी पक्षशिस्त पाळण्याची तयारी दर्शवली. पण हीच गोष्ट त्यांच्या समर्थकांच्या जिव्हारी लागली.

Nagpur Politics

Nagpur Politics

योगेश पांडे

02 Jan 2026 (अपडेटेड: 02 Jan 2026, 01:34 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

वरिष्ठांचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी निरोप

point

संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आपल्याच उमेदवाराला घरात कोंडलं

Nagpur Mahanagar Palika Election 2026 ,नागपूर : नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपमध्ये अंतर्गत बंडाळी उफाळून आली असून, प्रभाग क्रमांक 13-ड मध्ये अक्षरशः राजकीय नाट्य पाहायला मिळालं. पक्षाच्या वरिष्ठांनी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा निरोप दिल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी थेट आपल्या उमेदवारालाच घरात कोंडल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. या घटनेमुळे नागपूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

उमेदवारासह कुटुंबियांना घरातच कोंडलं 

भाजपाचे पदाधिकारी किसन गावंडे यांनी प्रभाग 13-ड मधून बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सुरुवातीला पक्षाकडून त्यांच्या नावाला हिरवा कंदील मिळाल्याचं चित्र होतं. मात्र, शेवटच्या टप्प्यात पक्षाने अचानक भूमिका बदलत गावंडे यांना अर्ज माघारी घेण्याचा आदेश दिला. हा आदेश मिळताच गावंडे यांनी पक्षशिस्त पाळण्याची तयारी दर्शवली. पण हीच गोष्ट त्यांच्या समर्थकांच्या जिव्हारी लागली.

गावंडे अर्ज मागे घेणार असल्याची माहिती मिळताच त्यांच्या समर्थकांनी संताप व्यक्त केला. “अर्ज मागे घ्यायचा नाही,” अशी भूमिका घेत कार्यकर्त्यांनी थेट गावंडे यांच्या घराला कुलूप ठोकलं. इतकंच नाही, तर गावंडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनाही घरातच डांबण्यात आलं. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असतानाच हा प्रकार घडल्याने तणाव अधिकच वाढला.

हेही वाचा : लग्नाला 14 दिवस उरले असताना नवरी समलिंगी मैत्रिणीसोबत फरार... लेसबिअन नात्याचं धक्कादायक प्रकरण

या प्रसंगी किसन गावंडे यांनी भावनिक आवाहन केलं. “कार्यकर्त्यांच्या भावना मला समजतात. मात्र, पक्षाचा आदेश पाळणं माझं कर्तव्य आहे,” अशी विनवणी त्यांनी केली. इतकंच नव्हे, तर त्यांनी समर्थकांसमोर हात जोडले, नम्रपणे विनंती देखील केली. तरीही संतप्त कार्यकर्ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यांनी भाजपच्या नेतृत्वावर उघडपणे नाराजी व्यक्त करत कुलूप उघडण्यास ठाम नकार दिला.

कार्यकर्त्यांच्या संतापामागचं मुख्य कारण म्हणजे एबी फॉर्मचा गोंधळ आहे. प्रभाग 13-ड साठी किसन गावंडे आणि विजय होले या दोघांच्या नावाने एबी फॉर्म देण्यात आले होते. त्यामुळे गावंडे हेच अधिकृत उमेदवार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांना वाटत होता. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी गावंडे यांना माघार घ्यायला सांगण्यात आल्याने कार्यकर्ते भडकले. “आधी एबी फॉर्म का दिला? आमचं मत विचारात का घेतलं नाही?” असे सवाल उपस्थित करत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

या सगळ्या गोंधळानंतर भाजपचे नेते परिणय फुके घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संतप्त कार्यकर्त्यांशी संवाद साधत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ समजूत घालण्यानंतर अखेर घराचं कुलूप उघडण्यात आलं. त्यानंतर किसन गावंडे यांना उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी नेण्यात आलं. या घटनेमुळे नागपूर भाजपमधील अंतर्गत मतभेद, कार्यकर्त्यांची नाराजी आणि उमेदवारी प्रक्रियेतील गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या प्रकारामुळे भाजपच्या स्थानिक संघटनात्मक शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

पालघर : सलूनमध्ये 'काश्मीर बनेगा पाकिस्तान' गाणं मोठ्या आवाजात वाजवलं, पोलिसांनी आरोपीला उचललं...

 

    follow whatsapp