Raj Thackeray Meeting CM Devendra Fadnavis: मुंबईः महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. अलिकडेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युतीचे स्पष्ट संदेश दिला आहे. दोघेही बंधू हे महानगरपालिका निवडणूक एकत्र लढवू शकतात. मात्र, आता हे राजकारण पुन्हा एकदा वळण घेत असल्याचे दिसून येत आहे.
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर नव्या चर्चांना उधाण
खरं तर, बुधवारी बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या समर्थित उमेदवारांचा पराभव झाल्यानंतर दोन्ही भावांच्या एकत्र येण्यावर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
हे ही वाचा>> बेस्ट निवडणुकीत ठाकरे ब्रँड फेल.. साधा भोपळाही फोडला नाही, महापालिका निवडणुकीआधी ठाकरे बंधूंना मोठा झटका
दरम्यान, गुरुवारी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली, त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आलं आहे. दुसरीकडे, यावेळी फडणवीसांनी टीका करताना थेट म्हटलं की, जनतेने 'ठाकरे ब्रँड' नाकारला आहे.
अजित पवार ‘या’ भेटीवर काय म्हणाले?
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोघांची भेट केवळ सौजन्यपूर्ण भेट असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, ‘ही महाराष्ट्राच्या परंपरेचा आणि संस्कृतीचा एक भाग आहे, ज्यामध्ये लोक प्रमुख नेत्यांना भेटतात. त्यातून दुसरा कोणताही अर्थ काढण्याची गरज नाही.’
अजित पवार पुढे म्हणाले, ‘आता कोणी कोणाला भेटावे... कोणाला भेटायला जावे... मी यावर काय बोलावे? बरेच लोक भेटत राहतात. राज्याचे प्रमुख देवेंद्रजी तिथे आहेत, म्हणून लोक भेटत राहतील आणि कोणी सत्तेत असो वा नसो, कोणी राजकीय जीवनात असो वा नसो, बरेच लोक भेटत राहतात.’ अशी अत्यंत सावध प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.
हे ही वाचा>> ‘दोन शून्यां’ची बेरीज केली आणि त्यावर कितीही शून्ये जोडली तरी..' भाजप नेत्यानं ठाकरेंना डिवचलं
या भेटीबाबत त्यांनी माध्यमांना काहीही हाती लागणार नाही याची काळजी घेतलीय. त्यांच्या याच सावध पवित्र्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राज ठाकरे काय म्हणाले?
मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीचे कारण नगररचना मुद्द्यांशी संबंधित चर्चेवर आधारित असल्याचे राज ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील शहरांमध्ये पुनर्विकास होत आहे. लोकसंख्या वाढत आहे आणि वाहतूक वाढत आहे. ते म्हणाले की, मुंबईत वाहतूक ही एक मोठी समस्या आहे. लोकांना वाहतूक शिष्टाचार माहित नाहीत आणि ते त्यांची वाहने कुठेही पार्क करतात आणि निघून जातात.’
राज ठाकरे म्हणाले की, ‘आज मी मुख्यमंत्री आणि मुंबई पोलिसांशी या विषयावर चर्चा केली. मी एक सादरीकरण तयार केले आहे आणि आशा आहे की राज्य सरकार हा मुद्दा गांभीर्याने घेईल आणि त्यावर काम करेल.’ अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी यावेळी दिली आहे.
मात्र, राजकीय विश्लेषकांच्या मते ही भेट इतकी सरळसोप्पी नक्कीच नाही. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये आगामी महापालिका निवडणुकीबाबत निश्चितच चर्चा झाली असण्याची दाट शक्यता आहे.
यामुळे आगामी काळात या भेटीचे नेमके काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
