Pramod Jathar Profile Story : भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी पाच उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा केली आहे. या महत्त्वपूर्ण निवडणुकीसाठी पक्षाने आपल्या अनुभवी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी दिली असून, यामध्ये सुनील कर्जतकर, माधवी नाईक ,संजय भेंडे, प्रमोद जठार यांचा समावेश आहे. याशिवाय विवेक कोल्हे यांना देखील भाजपने विधानपरिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, भाजपने संधी दिलेले प्रमोद जठार कोण आहेत? आणि त्यांनी कोणती प्रतिक्रिया दिलीये? जाणून घेऊयात...
ADVERTISEMENT
प्रमोद जठार कोण आहेत?
भाजपचे कणकवलीचे माजी आमदार प्रमोद जठार यांना विधानपरिषदेची लॉटरी लागली असून भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या पाच नावांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे. 2009 मध्ये काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार रविंद्र फाटक यांचा अवघ्या 32 मतांनी पराभव करत प्रमोद जठार कणकवलीतून विधानसभेत पोहोचले होते. मात्र 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार नितेश राणे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर जठार यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष पदही सांभाळत संघटनात्मक कामकाजात सक्रिय भूमिका बजावली. शिवाय, कोकणातील वादग्रस्त प्रकल्पांचे समर्थन करताना पाहायला मिळतात. आता विधानपरिषदेत त्यांच्या रूपाने कोकणाला पुन्हा एक प्रतिनिधित्व मिळणार असून भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.
विधानपरिषदेची संधी मिळाल्यानंतर प्रमोद जठार काय म्हणाले?
प्रमोद जठार म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आणि भाजपच्या सर्व नेत्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी मला यावेळी विधानपरिषदेची उमेदवारी दिली. कोकणात काम करण्याची संधी माझ्या पक्षाने दिली. पक्षाचं लक्ष असतं, श्रद्धा आणि सबुरीची गरज असते. असाच विश्वास आमच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे. मी माझ्या सगळ्या नेत्यांचा आभारी आहे.
संजय भेंडे कोण आहेत?
राष्ट्रीय संघाचे स्वयंसेवक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये सक्रियपणे काम करत राहिले. भाजप मध्ये संघटनात्मक पदावर काम करण्याचा अनुभव आहे. नागपूर नागरिक सहकारी बँकेचे संचालक आहेत. मैत्री परिवार संस्था नामक NGO चे अध्यक्ष आहेत. नागपुरातील न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे उपमुख्याध्यापक होते. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी या दोन्ही नेत्यांच्या विश्वासू म्हणून नाव आहे. गडकरी, फडणवीस यांच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत संघटनेची जबाबदारी सांभाळली आहे. संघटनेचा मोठा अनुभव आहे. महाराष्ट्र प्रदेश भाजप मध्ये प्रदेश पदाधिकारी म्हणून कामाचा अनुभव आहे.
संजय भेंडे यांची प्रतिक्रिया
"मला दिलेल्या संधीचे मी सोने करीन, जनतेच्या समस्याचे समाधान करण्यावर माझा भर असेल. पक्षाने माझ्यावर न्याय केला अस मी म्हणणार नाही कारण, पक्ष हा न्याय करत असतो. पक्ष योग्य व्यक्तींची निवड करत असत, यावेळी माझी निवड केली. 4200 कोटीचा व्यवसाय असलेल्या बँकेचा मी अध्यक्ष आहे. सहकार क्षेत्रातील समस्या सोडवणार, शिक्षण क्षेत्राच्या समस्या मी सोडवणार. जनतेच्या समस्यांना वाचा मी फोडणार आहे. भाजपने कोणाचाही पत्ता कट करत नाही, काहींना लवकर संधी मिळते, काहींना उशिरा संधी मिळते. पक्षाने मला संधी दिली त्यासाठी पक्षाचे आभार", अशी प्रतिक्रिया संजय भेंडे यांनी दिली आहे.
याशिवाय, भाजपने विधानपरिषद दिलेले विवेक कोल्हे हे सहकार चळवळीतील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे नातू आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीत कोपरगावची भाजपची जागा राष्ट्रवादीकडे गेली. विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळेंसाठी भाजपच्या स्नेहलता कोल्हेंना माघार घ्यावी लागली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











