Nitesh Rane bungalow An unattended bag was found outside : मंत्री नितेश राणे यांच्या सुवर्णगड बंगल्याबाहेर एक बेवारस बॅग सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर संशयास्पद बॅग आढळल्याने सुरक्षा यंत्रणा तातडीने अलर्ट झाली असून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे नितेश राणे यांच्या जीवितास धोका निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
ADVERTISEMENT
सुवर्णगड बंगल्याच्या बाहेरील परिसरात ही बेवारस बॅग दिसून आल्यानंतर स्थानिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. बॅग संशयास्पद असल्याने संपूर्ण परिसराची नाकाबंदी करत नागरिकांची ये-जा काही काळासाठी थांबवण्यात आली. पोलिसांकडून बॅगची तपासणी सुरू असतानाच त्यावर एक चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीत “या बॅगमध्ये बूट आणि कपडे आहेत. ते तुम्ही मोफत घेऊ शकता,” असा संदेश लिहिलेला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या बॅगेत काय आहे? याची तपासणी पोलिसांनी सुरु केली आहे. धोका टाळण्यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण तपास प्रक्रिया काटेकोरपणे राबवली.
हेही वाचा : मुंबईतील ठाकरे बंधूंच्या सभेआधी उद्धव ठाकरेंची मुंबई Tak वर Super Exclusive महामुलाखत
दरम्यान, सुवर्णगड बंगल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता, एक तरुण ही बॅग त्या ठिकाणी ठेवून जात असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. संबंधित तरुणाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असून, तो नेमका कोण आहे आणि त्यामागचा उद्देश काय होता, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमागे केवळ खोडसाळपणा आहे की काही वेगळा हेतू, याची चौकशी सुरू आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, मागील काही दिवसांपासून मंत्री नितेश राणे हे प्रखर हिंदुत्ववादी भूमिका मांडत आहेत. त्यांच्या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण तापलेले असताना, त्यांच्या निवासस्थानाबाहेर अशा प्रकारे बेवारस बॅग सापडल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यामुळे पोलिसांकडून या घटनेचा प्रत्येक पैलू तपासला जात आहे. आज नितेश राणे यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभा होणार असून, त्याआधीच ही घटना घडल्याने त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात येत आहे. मंत्र्यांच्या सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सध्या पोलिसांकडून बॅगची तपासणी पूर्ण करण्यात आली असून, पुढील तपास सीसीटीव्ही फुटेज आणि तरुणाच्या ओळखीवर केंद्रित आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











