इस्लामाबाद: भारताने अलीकडेच पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवादी घोषित केलेला मसूद अझहर याच्या कुटुंबाला मोठी आर्थिक भरपाई मिळण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतीय हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक नागरिकाच्या कायदेशीर वारसाला 1 कोटी रुपये (10 दशलक्ष पाकिस्तानी रुपये) देण्याची घोषणा केली आहे.
ADVERTISEMENT
या हल्ल्यात मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, ज्यामध्ये त्याची मोठी बहीण, तिचा पती, पुतणी पुतण्या आणि त्यांची पत्नी तसेच अनेक मुले यांचा समावेश आहे, असे पाकिस्तानच्या 'डॉन' आणि 'असोसिएटेड प्रेस ऑफ पाकिस्तान' (APP) या वृत्तसंस्थांनी नमूद केले आहे.
जर मसूद अझहर हा एकमेव कायदेशीर वारस असेल, तर त्याला तब्बल 14 कोटी रुपये मिळू शकतात, अशी शक्यता आहे. या घोषणेमुळे पाकिस्तान सरकारच्या दहशतवादाविषयीच्या धोरणांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
भारताचे अचूक हवाई हल्ले आणि पाकिस्तानची भरपाई योजना
भारतीय हवाई दलाने 7 मे रोजी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूर येथील दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले केले होते. हे तळ जैश-ए-मोहम्मदचा गड मानले जातात आणि येथे जमिया मस्जिद सुभान अल्लाह, ज्याला उस्मान-ओ-अली कॅम्पस असेही म्हणतात, हे JeM चं मुख्यालय आहे.
भारतीय अधिकाऱ्यांनी या हल्ल्यांमध्ये केवळ दहशतवादी तळांवरच निशाणा साधला आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी या हल्ल्यात नष्ट झालेल्या घरांचे आणि मशिदींचे पुनर्बांधण करण्याचे आश्वासन दिले आहे, ज्यामुळे भारतात संताप व्यक्त होत आहे. सुरक्षा तज्ज्ञांनी चेतावणी दिली आहे की, या 'पुनर्बांधणी'मुळे पुन्हा एकदा दहशतवादी प्रशिक्षण आणि भर्ती केंद्रे उभी राहण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानची 'मार्का-ए-हक' मोहीम
पाकिस्तान सरकारने भारतीय हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांसाठी आणि सैन्य कर्मचाऱ्यांसाठी 'मार्का-ए-हक' नावाची व्यापक भरपाई योजना जाहीर केली आहे. पाकिस्तानच्या सरकारी वृत्तसंस्था APP नुसार, या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
नागरिकांसाठी:
- मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक नागरिकाच्या कुटुंबाला 1 कोटी रुपये (10 दशलक्ष PKR).
- जखमी नागरिकांना 10 ते 20 लाख रुपये.
- नष्ट झालेल्या घरांचे आणि मशिदींचे पुनर्बांधण.
लष्करी कर्मचाऱ्यांसाठी:
- शहीद सैनिकांच्या कुटुंबाला 1 कोटी ते 1.8 कोटी रुपये, रँकनुसार.
- 1.9 कोटी ते 4.2 कोटी रुपये किंमतीची गृहसहाय्य योजना.
- शहीद सैनिकांच्या कुटुंबाला त्यांच्या निवृत्तीच्या तारखेपर्यंत पूर्ण पगार आणि भत्ते.
- शहीदांच्या मुलांना पदवीपर्यंत मोफत शिक्षण.
- प्रत्येक शहीदाच्या एका मुलीला लग्नासाठी 10 लाख रुपये.
- जखमी सैनिकांना 20 ते 50 लाख रुपये.
लष्कर-ए-तैबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयांचे पुनर्बांधणी
भारतीय हवाई हल्ल्यांमध्ये लष्कर-ए-तैबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयांचा पूर्णपणे नाश झाला आहे. मात्र, पाकिस्तान सरकारने या दहशतवादी संघटनांच्या मुख्यालयांचे पुनर्बांधण करण्याचे आश्वासन दिले आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायात आणि विशेषतः भारतात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पंतप्रधान शरीफ यांनी म्हटले आहे की, “शहीदांच्या मुलांची जबाबदारी सरकारची आहे, आणि आम्ही ती पूर्ण करू.” तसेच, जखमींच्या वैद्यकीय उपचारांचा सर्व खर्च सरकार उचलणार आहे.
पाकिस्तानच्या करदात्यांचा पैसा दहशतवाद्यांच्या कुटुंबासाठी?
पाकिस्तान सरकारच्या या निर्णयावर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका होत आहे. दहशतवादी संघटनांच्या नेत्यांच्या कुटुंबीयांना करदात्यांच्या पैशातून भरपाई देण्याच्या निर्णयामुळे पाकिस्तान सरकारच्या दहशतवादाविरोधातील भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पंतप्रधान शरीफ यांनी असेही जाहीर केले की, पाकिस्तानच्या संरक्षण आणि सन्मानासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाईल, ज्यामुळे या योजनेचा दुरुपयोग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या घडामोडींमुळे भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे, आणि आंतरराष्ट्रीय समुदाय या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
ADVERTISEMENT
