मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी जेव्हापासून आंदोलन सुरू केलं, तेव्हापासून सरकारच्या वतीने तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा त्यांचे निकटचे सहकारी जरांगे पाटलांसोबत चर्चा करायचे. मनोज जरांगेंनी अनेकदा एकनाथ शिंदेंचं कौतुक करत फडणवीसांवर टीका केली. परिणामी जरांगे-पाटील हे एकनाथ शिंदेंच्या शब्दाबाहेर नाहीत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात व्हायची. परंतु आझाद मैदानातल्या जरांगे पाटलांच्या पाच दिवसांच्या आंदोलनात एकनाथ शिंदे कुठेच नव्हते. त्यांचे सहकारी उदय सामंत आणि प्रताप सरनाईक चर्चेवेळी आझाद मैदानावर होते. परंतु ती सगळी चर्चा किंवा वाटाघाटीचं नेतृत्व हे भाजपचे नेते आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील करत होते.
ADVERTISEMENT
CM फडणवीसांनी मनोज जरांगेंचं आंदोलन मागे घेण्याची जबाबदारी सोपावलेली विखे-पाटील आणि शिवेंद्रराजेंवर...
जरांगे-पाटलांवर उपोषण सोडण्यासाठी अप्रत्यक्ष दबाब यावा, यासाठी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनाही पाठवलं. याच दोन नेत्यांचा शब्द अंतिम मानत जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतलं. त्यामुळे जरांगे पाटलांसोबतच्या चर्चेत आणि मराठा आंदोलन हाताळताना भाजपने आणि परिणामी मुखमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना दूर ठेवलं का? असा सवाल अनेक जण उपस्थित करत आहेत.
हे ही वाचा>> हैदराबाद गॅझेट गेमचेंजर ठरेल का?, मराठ्यांना OBC आरक्षणाचा लाभ मिळणं खरंच आहे सोप्पं?
मागच्या वेळी जरांगे पाटील जेव्हा मुंबईत आले तेव्हा शासनाची अधिसूचना घेऊन एकनाथ शिंदे हे वाशीत पोहचले होते. जरांगेंसोबत क्रेनवर गुलाल घेतल्यानंतर शिंदेंच्या प्रयत्नांची चांगलीच चर्चा झाली. परंतु यावेळच्या मराठा आंदोलनाच्या सर्कलमध्ये एकनाथ शिंदे कुठेच नव्हते. जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर एकनाथ शिंदे हे त्यांच्या साताऱ्यातील दरे गावी गेले.
एकनाथ शिंदे का होते दूर?
ज्यावेळेला जरांगे-पाटील आझाद मैदानावर उपोषणाला बसले, तेव्हाही एकनाथ शिंदे सक्रीय झाल्याचं पाहायला मिळालं नाही. मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जेव्हा बैठक बोलावली, त्याला मात्र, एकनाथ शिंदे पोहचल्याचं पाहायला मिळालं. पहिले पाच दिवस जरांगेंसोबत चर्चा करायला कुठलाच मंत्री पोहचलेला नव्हता. जेव्हा गेले तेव्हा त्या समितीचं नेतृत्व भाजपचे मंत्री करत होते. त्यामुळं जरांगेंसोबत चर्चा किंवा वाटाघाटीत शिंदेंना दूर ठेवण्यात आलं की ते स्वत: दूर राहिले हा प्रश्न निर्माण होतो आहे.
हे ही वाचा>> मनोज जरांगेंच्या मनात एकनाथ शिंदेंनी फसवल्याची भावना आता का आली?
मराठा आंदोलन सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी आंदोलन हाताळण्याची सगळी जबाबदारी घेतल्याचं पाहायला मिळालं. बैठका घेण्यापासून ते उपसमिती नेमण्यापर्यंत, हैद्राबाद गॅझेटबद्दल कायदेशीर सल्ला घेण्यापासून ते जरांगेंसोबत वाटाघाटी करण्यापर्यंत. या सगळ्या घडामोडींच्या मागे अप्रत्यक्षरित्या फडणवीस होते.
जरांगेंचं उपोषण सोडवून आलेल्या विखे पाटलांनीसुद्धा या प्रकरणाचं सगळं क्रेडिट मुख्यमंत्री फडणवीसांना दिलं. त्यामुळं मनोज जरांगेंसोबत चर्चा करण्यापासून एकनाथ शिंदेंना भाजपने दूर ठेवलं का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
