मनोज जरांगेंच्या मनात एकनाथ शिंदेंनी फसवल्याची भावना आता का आली?

मुंबईतील आंदोलनानंतर मनोज जरांगे यांच्या हाती थेट जीआर मिळाला. पण वाशीमध्ये फसवणूक झाल्याची भावना मनोज जरांगे यांनी बोलून दाखवली. तेव्हा नेमकं काय घडलेलं हे आपण आता जाणून घेऊया.

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: मनोज जरांगेंचं मुंबईत आंदोलन झालं, जीआर आला आणि मराठा आंदोलक परतले. मात्र, आंदोलन सोडण्याआधी जरांगेंनी एकनाथ शिंदेंसंदर्भात केलेलं एक वक्तव्य चर्चेत आहे. एकनाथ शिंदे यांनी फसवल्याचीच भावनाच एकप्रकारे त्यांनी व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळ उपसमितीसमोर स्टेजवर बोलताना 'यावेळेस वाशीसारखं नको..' असं जरांगे बोलता बोलता बोलून गेले. पण या एका वाक्यामागे मोठी गोष्ट लपली आहे. यात जरांगेंना शिंदेंनी फसवलं असल्याचीच भावना एकप्रकारे बोलून दाखवली आहे.

वाशीत नेमकं काय झालेलं, जरांगे पाटील यावेळी असं का बोलले यामागचं राजकारण काय हेच आपण सविस्तर जाणून घेऊया.

फडणवीसांनी हैदराबाद गॅझेट लागू केल्यावर एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

सरकारने सकारात्मक भूमिका घेतली. आम्ही सुरुवातीपासून सकारात्मक होतो. कायदा टिकला पाहिजे याबाबत आम्ही विचार केल्याचं जरांगेंच्या आंदोलनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मनोज जरांगे गेल्या दोन वर्षापासून लढत आहेत संवेदनशील आहेत असे एकनाथ शिंद म्हणाले. ओबीसी समाज नाराज होणार नाही, कारण त्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी मुख्यमंत्री फडणवीस आणि आम्ही घेतली आहे असे शिंदे म्हणाले.

हे ही वाचा>> Maratha Reservation: 'मला दोष दिले, शिव्या दिल्या तरीही मी...', पाहा जरांगेंनी आंदोलन मागे घेताच CM फडणवीस काय म्हणाले

मराठा समाजावर अन्याय होऊ नये, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले खरे मात्र आंदोलनादरम्यान शिंदे नेमके कुठे होते? हा प्रश्न अनेकजण विचारत होते. 

आंदोलन संपवताना जरांगेंनी वाशीचा उल्लेख केला आणि त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंवर एकप्रकारे अविश्वासच दाखवला. आता यासाठी शिंदेंनी वाशीमध्ये नेमकं काय म्हटलेलं ते पाहणं, तो इतिहास पाहणं आवश्यक आहे.

वाशीमध्ये जाऊन एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?

अंतरवाली सराटी गावात तब्बल 17 दिवस उपोषण केलेलं.. त्यावेळी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे एकनाथ शिंदे यांच्या हाती होती, तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. त्यावेळी शिंदेंनी जरांगे यांच्या काही मागण्या मान्य करून त्यांचं उपोषण सोडलेलं आणि कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीची स्थापनाही केली. काही दिवस उलटल्यानंतरही काही मागण्या पूर्ण न झाल्याने जरांगे रागातच मुंबईकडे निघाले होते.

हे ही वाचा>> मोठी बातमी: आरक्षणाबाबत 'हे' GR काही तासात येणार, मनोज जरांगेंचा प्रत्येक शब्द जसाच्या तसा..

20 जानेवारी 2024 ला अनेक मराठा आंदोलक वाशीत येऊन धडकले होते, मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासह अनेक मागण्या केल्या. 54 लाख नोंदी सापडलेल्या कुटुंबांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी त्यांची पहिली मागणी होती. तर कुणबी प्रमाणपत्र नोंद सापडणाऱ्या कुटुंबाला सरसकट आरक्षण आणि ज्याची नोंद सापडली, त्याच्या सग्यासोयऱ्यांनाही प्रमाणपत्र द्यावं, अशा तीन मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी केल्या होत्या. 

सरकारने या मागण्या तातडीने पूर्ण न केल्यास आझाद मैदानाकडे कूच करू असा इशाराही जरांगेंनी दिला होता.

यानंतर बैठका घेत सरकारकडून तातडीने अध्यादेश काढण्यात आला. या निर्णयाची माहिती मनोज जरांगे पाटील यांना देण्यासाठी 27 जानेवारीच्या मध्यरात्री मंत्री मंगल प्रभात लोढा आणि दीपक केसरकर वाशी परिसरात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांना अध्यादेशाची माहिती दिली. यावेळी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेच उपोषण सोडणार असं जरांगे यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीसुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला आणि जरांगे यांचं उपोषण सोडण्यासाठी ते स्वत: अध्यादेश घेऊन वाशीमध्ये पोहोचले होते. 

शिंदे यांनी मनोज जरांगेंना गुलाल लावला. यावेळी मराठा आंदोलकांना संबोधित करताना मनोज जरांगे म्हणालेले, “एकनाथ शिंदेंनी समाजासाठी चांगलं काम केलं. शिंदे समितीने केलेल्या पडताळणीत 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या. त्यापैकी 37 लाख लोकांना कुणबीची प्रमाणपत्र वाटण्यात आली. इतरांनाही प्रमाणपत्रे वाटली जाणार असल्यानं आता आपला विरोध आणि आंदोलन संपलं आहे. मी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन उपोषण सोडतो आहे.”

यानंतर शिंदे यांनी “मराठ्यांनी अनेकांना मोठं केलं आणि मोठमोठ्या पदांवर बसवलं. आता मला मराठा समाजाला न्याय देण्याची संधी आली आहे. आजचा दिवस हा तुमच्या विजयाचा दिवस आहे. सरकारने जे निर्णय घेतले, त्यामध्ये कुणबी नोंदी शोधणाऱ्या शिंदे समितीला मुदतवाढ, प्रमाणपत्र देण्याचं शिबीर घेण्यासाठी अधिसूचना, नोंदी शोधण्यासाठी समिती, कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. ओबीसी समाजावरही अन्याय होणार नाही; पण त्यांना ज्या सवलती मिळतात, त्याच सवलती मराठ्यांना दिल्या जातील.' असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. 

आता हा झाला वाशी घडलेला प्रसंग... आता पुन्हा या प्रसंगाचा वारंवार उल्लेख होतो आहे. याची सुरुवात झाली ती राज ठाकरेंच्या विधानाने. आंदोलनावर ठाकरेंना विचारल्यानंतर त्यांनी “या गोष्टींवर केवळ एकनाथ शिंदे बोलू शकतात. कारण मागील वेळेस एकनाथ शिंदे हेच नवी मुंबईला गेले होते ना? त्यांनी नवी मुंबईत जाऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला असं सांगितलं जात होतं. मग मराठा आंदोलक परत का आले याचं उत्तरं फक्त एकनाथ शिंदेच देऊ शकतात,” असं त्यांनी म्हटलेलं. 

दरम्यान शिंदेंवरुन जरांगे यांना आताच्या आंदोलनावेळीही विचारलं गेलेलं. त्यावेळी त्यांचा पूर्ण राग हा फडणवीसांवर दिसून आला. “देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्र्यांना तसेच कोणत्याही मंत्र्यांना काम करू देत नाहीत.'' असं जरांगे म्हणालेले. मात्र उपोषण सोडताना त्यांनी वाशीत जे झालं ते पुन्हा होऊ नये असं बोलून शिंदेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं, शिवाय फडणवीसांशी वैर संपलं असं सु्द्धा जरांगे पाटील बोलले. यावरुन आता चर्चा होताना दिसत आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp