Maratha Reservation: 'मला दोष दिले, शिव्या दिल्या तरीही मी...', पाहा जरांगेंनी आंदोलन मागे घेताच CM फडणवीस काय म्हणाले
Maratha Reservation and Devendra Fadanvis: मनोज जरांगे यांनी मुंबईतील आंदोलन मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणाबाबत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. पाहा फडणवीस यावेळी नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

नागपूर: 'मला दोष दिले, शिव्या दिल्या.. तरीही मी समाजाकरिता काम कालही करत होतो, आजही करत आहे. उद्याही करत राहील. प्रत्येक समाजाकरिता काम करतो. काम करताना कधी शिव्या मिळतात कधी फुलांचे हारही मिळतात.' अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली.
पाहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
'हैदराबाद गॅझेट लागू करण्याकरिता आमची सुरुवातीपासून तयारी...'
'एक चांगला तोडगा, मराठा समाजाच्या हिताचा तोडगा आज मंत्रिमंडळ उपसमितीने काढला. त्यामुळे जे काही उपोषण चालू होतं ते उपोषण संपविण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करण्याकरिता आमची सुरुवातीपासून तयारी होती. पण त्यातील महत्त्वाचा विषय असा होता की, त्याठिकाणी मनोज जरांगे यांची जी मागणी होती की, सरसकटची त्यामध्ये कायदेशीर अडचणी होत्या.'
हे ही वाचा>> Maratha Reservation GR: सरकारचा मोठा निर्णय.. पहिला GR आला समोर, वाचा नेमकं काय आहे त्यात! GR जसाच्या तसा
'हायकोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय बघता अशा प्रकारे सरसकट करणं शक्य नव्हतं. विशेषत: आपण याठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की, या संदर्भात वस्तुस्थिती त्यांच्या लोकांच्या देखील लक्षात आणून दिली. मंत्रिमंडळ उपसमितीच्या देखील लक्षात आणून दिलं की, आपल्या कायद्याप्रमाणे, संविधानप्रमाणे आरक्षण हे समूहाला नसतं ते व्यक्तीला मिळत असतं. म्हणूनच अशाप्रकारे सरसकट करता येणार नाही. ते कायद्याच्या पातळीवर टिकणार नाही.'
'त्यांनी देखील काल ती भूमिका समजून घेतली, स्वीकारली.. जर कायद्यात सरसकट बसत नसेल तर सरसकट करू नका. याबाबत उपसमितीमध्ये चर्चा झाली त्याचा जीआर तयार झाला. त्यात काही बदल होते ते बदल केले. त्यासंदर्भात जीआर जारी झाला आहे.'