मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) विधानसभा पक्षनेते आणि आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पेट्रोल आणि डिझेलवरील राज्य सरकारचा व्हॅट (VAT) व सरचार्ज तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी स्पष्ट गणित सादर करून सांगितले आहे की, हे दोन्ही कर रद्द केल्यास मुंबईत सध्या 111.12 रुपयांना मिळणारे पेट्रोल आणि 96.86 रुपयांना मिळणारे डिझेल थेट 70 ते 80 रुपयांच्या दरात उपलब्ध होऊ शकते. यामुळे केवळ वाहनधारकांनाच नव्हे, तर वाहतूक, शेती, उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा मिळेल, असे त्यांनी नमूद केले आहे.
ADVERTISEMENT
जयंत पाटील यांनी 25 मे 2026 रोजी लिहिलेल्या या पत्रात सविस्तर माहिती दिली आहे.
पत्रातील मुख्य मुद्दे आणि गणित
सध्याची महागाईची परिस्थिती : अमेरिका-इराण युद्ध, आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाचे दर, खाद्यतेल, भाजीपाला यांच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहेत. यात भर घालणारी बाब म्हणजे केंद्र सरकारकडून वारंवार पेट्रोल-डिझेलच्या दरात केली जाणारी वाढ. 25 मे रोजीच पेट्रोल 2 रुपये 52 पैशांनी तर डिझेल 2 रुपये 19 पैशांनी महागले.
हे ही वाचा>> महागाईचा भडका, 10 दिवसात पेट्रोल-डिझेल 7 रुपयांनी महागलं; पाहा लेटेस्ट किंमती
मुंबईतील सध्याचे दर (25 मे 2026)
- पेट्रोल : 111.12 रुपये प्रति लिटर
- डिझेल : 96.86 रुपये प्रति लिटर
राज्य सरकारचे कर
- पेट्रोलवर : अंदाजे 25% व्हॅट + 10.12 रुपये प्रति लिटर सरचार्ज
- डिझेलवर : अंदाजे 24% व्हॅट + 3.00 रुपये प्रति लिटर सरचार्ज
स्वस्त होण्याचे गणित : वरील व्हॅट आणि सरचार्ज रद्द केल्यास सध्या 122 रुपयांना मिळणारे पेट्रोल-डिझेल थेट 70 ते 80 रुपयांत मिळू शकते. यामुळे सामान्य नागरिक, शेतकरी, वाहतूक व्यवसाय आणि छोटे उद्योग यांना मोठा फायदा होईल, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा>> समजून घ्या: कच्चं तेल स्वस्त झालं तरीही पेट्रोल-डिझेल का महाग... सरकार का करतंय असं?
पत्रात ते म्हणतात, “कठीण आर्थिक परिस्थितीत नागरिकांच्या हिताचा विचार करून राज्य शासनाने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा.” सलग दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे हाल होत असल्याने तातडीने दिलासा देण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राजकीय पार्श्वभूमी
जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी पूर्वी गृह, अर्थ, ग्रामविकास आणि जलसंपदा अशा महत्वाच्या खात्यांचा कारभार सांभाळला आहे. ते राज्याचे अर्थमंत्री असताना त्यांनीच देवेंद्र फडणवीस यांना अर्थसंकल्प नेमका कसा समजून घ्यायचा हे सांगितलं होतं. या गोष्टीचा उल्लेख त्यांनी अनेकदा आपल्या जाहीर भाषणामधूनही केला आहे. आता याच जयंत पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीसांना स्वस्त पेट्रोल-डिझेलचं गणित देखील समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
जयंत पाटील हे सध्या विधानसभेत विरोधकांच्या बाकावर आहेत. केंद्र सरकारच्या पेट्रोल-डिझेल धोरणावर वारंवार टीका करणारे पाटील यांनी आता राज्य सरकारला जबाबदार धरत कर कमी करण्याची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT











