गुंड गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी, रुपाली ठोंबरेंनाही मैदानात उतरवलं, राष्ट्रवादीने यादी न जाहीर करता AB फॉर्म वाटले

Pune Mahanagar Palika Election 2026 : याशिवाय पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीकडून अचानक घेतलेल्या या निर्णयांमुळे पुण्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

Pune Mahanagar Palika Election 2026

Pune Mahanagar Palika Election 2026

मुंबई तक

30 Dec 2025 (अपडेटेड: 30 Dec 2025, 12:28 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

गुंड गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी, रुपाली ठोंबरेंनाही मैदानात उतरवलं

point

राष्ट्रवादीने यादी न जाहीर करता AB फॉर्म वाटले

Pune Mahanagar Palika Election 2026 : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्म वाटप करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीकडून कुख्यात गुंड गजा मारणे यांच्या पत्नी जयश्री मारणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीकडून अचानक घेतलेल्या या निर्णयांमुळे पुण्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

हे वाचलं का?

राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज मंगळवार (30 डिसेंबर) हा अंतिम दिवस आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत केवळ चार तास अर्ज भरण्याची मुदत असल्याने निवडणूक कार्यालयांमध्ये उमेदवारांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र, बंडखोरी टाळण्यासाठी आणि अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येऊ नयेत यासाठी अनेक पक्षांनी अद्याप उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केलेली नाही. त्याऐवजी निवड झालेल्या उमेदवारांना थेट एबी फॉर्म देऊन उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने काही धक्कादायक निर्णय घेतले आहेत. पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे यांची पत्नी जयश्री मारणे यांना प्रभाग क्रमांक 10, बावधन येथून एबी फॉर्म देण्यात आला आहे. जयश्री मारणे या राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार असून त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. गुन्हेगारीविरोधात सातत्याने भूमिका मांडणाऱ्या अजित पवार गटाने गजा मारणे यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीतील आणखी एक नेते दीपक मानकर यांचे कुटुंबीयही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दीपक मानकर यांची दोन्ही मुले वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवत आहेत. बापू मानकर यांना भाजपकडून तर हर्षवर्धन मानकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. एकाच घरातील दोन सदस्य परस्परविरोधी पक्षांचे उमेदवार असल्याने दीपक मानकर यांची राजकीय भूमिका नेमकी काय असेल, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनाही अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवार यांनी स्वतः रुपाली ठोंबरे पाटील यांना एबी फॉर्म दिला असून त्या प्रभाग क्रमांक 26 मधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागातील लढत अधिकच रंगतदार होणार असल्याचे बोलले जात आहे.

एकीकडे उमेदवारांची यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्म वाटप, तर दुसरीकडे वादग्रस्त आणि चर्चेतील नावांना उमेदवारी देण्याची रणनीती राष्ट्रवादीने अवलंबल्याचे स्पष्ट होत आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आणखी कोणकोणत्या नावांवर शिक्कामोर्तब होते, याकडे आता पुणेकरांचे आणि राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

बुलढाणा : पत्नीचं अफेअर असल्याचा संशय, नवऱ्याने बायको अन् 4 वर्षीय मुलाला कुऱ्हाडीने वार करुन संपवलं

    follow whatsapp