पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि भाजपमधील समन्वय बिघडला असून युती तुटल्यात जमा असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गुरुवारी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीदरम्यान शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर आणि शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी अचानक बैठकीतून बाहेर पडत नाराजी व्यक्त केली. या घडामोडींमुळे पुण्यात सेना-भाजप युती तुटल्यात जमा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
ADVERTISEMENT
शहरातील एका हॉटेलमध्ये ही बैठक पार पडत होती. मात्र उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या येण्यापूर्वीच धंगेकर आणि भानगिरे दोघेही बैठक अर्धवट सोडून निघून गेल्याने चर्चा निष्फळ ठरल्याच समोर आलं. बैठकीत शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी पक्ष 15 जागांवर लढणार असल्याची माहिती दिल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पाहायला मिळाला. याच मुद्द्यावरून वातावरण तापले आणि अखेर धंगेकरांनी बैठकीतून उठून जाण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, भाजपकडून रवींद्र धंगेकरांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही केला जात आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक 23 आणि 24 मध्ये शिवसेनेसाठी जागा सोडण्यास भाजपने नकार दिल्यामुळे नव्या राजकीय समीकरणांची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे शिवसेना पुण्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
शिवसेना पुण्यात तब्बल 165 जागा लढवण्याच्या तयारीत असून, सर्व उमेदवारांना एबी फॉर्म देऊन अर्ज भरले जाणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. एकूण 165 इच्छुकांना एबी फॉर्म देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. “कार्यकर्त्यांच्या भावना महत्त्वाच्या आहेत आणि त्यांचा पूर्णपणे आदर केला जाईल,” असे रवींद्र धंगेकर यांनी यावेळी सांगितल्याचे समजते.
या घडामोडींनंतर पुण्यात शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार नाहीत, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे पुणे महापालिका निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची शक्यता असून, महायुतीतील अंतर्गत तणाव आता उघडपणे समोर येऊ लागला आहे. शिवसेनेची पुढील रणनीती काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











