नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी जंतर-मंतरच्या दिशेने निघालेल्या INDIA ब्लॉकच्या विरोधी खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर दिल्लीतील राजकीय वातावरण तापलं आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह विरोधी पक्षांच्या अनेक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, राहुल गांधींना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या बसला काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंक्चर केल्याने जंतर-मंतर परिसरात मोठा गोंधळ झाला.
ADVERTISEMENT
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आवाहनानंतर INDIA ब्लॉकचे खासदार दिल्लीतील जनपथ येथील सागर रत्ना रेस्टॉरंटमध्ये एकत्र आले होते. त्यानंतर हे खासदार जंतर-मंतरच्या दिशेने निघाले. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखत ताब्यात घेण्यास सुरुवात केली. संपूर्ण परिसरात BNS कलम 163 लागू करण्यात आले होते.
राहुल गांधींना ताब्यात घेऊन बसमध्ये बसवलं
सायंकाळी 5.53 वाजता राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेत बसमध्ये बसवले. त्यानंतर त्यांना छत्रसाल स्टेडियमच्या दिशेने नेण्यात येत होते. मात्र, राहुल गांधींना घेऊन जाणाऱ्या बसला काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंक्चर केल्याची माहिती समोर आली.
हे ही वाचा>> सलग दुसऱ्या दिवशी राहुल गांधी उतरले रस्त्यावर, नवी रणनीती आखली अन्...
सायंकाळी 6.49 वाजता राहुल गांधींना दुसऱ्या बसमधून नेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
जंतर-मंतरवर राहुल गांधी आणि पोलिसांमध्ये वाद
आंदोलनादरम्यान राहुल गांधी आणि दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांमध्येही जोरदार वाद झाल्याची माहिती आहे. ही घटना सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास घडली.
दरम्यान, मल्लिकार्जुन खर्गे यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस आणि विरोधी पक्ष संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरण्यास, अटक होण्यास किंवा खटल्यांना सामोरं जाण्यास तयार असल्याचं म्हटलं.
हे ही वाचा>> राहुल गांधींची सरकारविरोधात रस्त्यावरची लढाई; बॅरिकेडवर चढून फडकावला तिरंगा...
खर्गे यांनी नरेंद्र मोदी सरकार आणि निवडणूक आयोगामध्ये कथित संगनमत असल्याचा आरोपही केला. त्यांच्या मते, या कथित “एलायन्स”चा पर्दाफाश झाला असून आता राजीनामा आणि कारवाईची वेळ आली आहे.
प्रियंका गांधी रस्त्यावर आडव्या
या आंदोलनादरम्यान प्रियंका गांधी यांनीही पोलिसांच्या कारवाईचा विरोध केला. सायंकाळी 5.40 वाजता त्या जंतर-मंतरजवळील रस्त्यावर जमिनीवर आडव्या झाल्याची माहिती समोर आली.
नंतर प्रियंका गांधी यांनी महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी आपल्याला अनेक ठिकाणी ओरबाडल्याचा दावा केला. पोलिसांनी आपल्याला जमिनीवर पाडून तेथून हटवण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप त्यांनी केला.
“आम्ही फक्त निवडणूक आयुक्तांना भेटण्याची मागणी करत आहोत, तरीही संसद सदस्यांशी अशा प्रकारे वागणूक दिली जात आहे,” असा दावा प्रियंका गांधी यांनी केला.
काँग्रेसने प्रियंका गांधींचा व्हिडिओ केला पोस्ट
सायंकाळी 6.53 वाजता काँग्रेसने आपल्या अधिकृत X हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये प्रियंका गांधी बसमध्ये बसलेल्या दिसत असून त्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिसत आहेत.
समाजवादी पक्ष आंदोलनात सहभागी नाही
दरम्यान, समाजवादी पक्ष या आंदोलनात सहभागी नसल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, समाजवादी पक्षाला आंदोलनासाठी योग्य पद्धतीने निमंत्रण देण्यात आले नव्हते आणि या संदर्भात पक्षाशी पुरेसा संवादही झाला नसल्याचे सांगण्यात आले.
दिल्लीत राजकीय संघर्ष तीव्र
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनाला रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर काँग्रेस आणि विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह अनेक नेत्यांना ताब्यात घेतल्याने जंतर-मंतर परिसरातील परिस्थिती चिघळली आहे.
दरम्यान, राहुल गांधींना घेऊन जाणारी पोलिसांची बस पंक्चर झाल्यानंतर त्यांना दुसऱ्या बसमधून नेण्याची तयारी करण्यात आली. त्यामुळे जंतर-मंतर परिसरात काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये आणखी तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे.
ADVERTISEMENT












