महाराष्ट्रातून लहान मुलं, मुली पळवल्या जातायत, राज ठाकरेंनी एनसीआरबी अहवालाचा दाखला देत फडणवीसांना सुनावलं..

Raj Thackeray : एनसीआरबीने लहान मुलांना पळवून नेण्यात येत असल्याचा अहवाल जाहीर केला, त्याचपार्श्वभूमीवर आता राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून लहान मुलं गायब होत आहेत, त्यावर तोडगा काढण्यावरून त्यांनी पत्राद्वारे माहिती दिली आहे.

Raj Thackeray

Raj Thackeray

मुंबई तक

13 Dec 2025 (अपडेटेड: 13 Dec 2025, 02:55 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

एनसीआरबीने केलेल्या अहवालाचा दाखला देत राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र

point

लहान मुलांच्या सुरक्षेबाबतचे अनेक प्रश्न उपस्थित केलेत.

Raj Thackeray : राज्यात सध्या लहान मुलं पळवली जात असल्याचा मुद्दा हा चांगलाच गाजला आहे. एनसीआरबीने जे आकडे समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे याबाबतची माहिती आता समोर आली आहे. याचपार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. त्यांनी राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना राज ठाकरेंनी पत्र लिहून अनेक लहान मुलांच्या सुरक्षेबाबतचे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. लहान मुलांना पळवून त्यांना कामाला जुंपणाऱ्या किंवा भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्यीय टोळ्या सक्रिय झाल्याचा आरोप त्यांनी केला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : कराड हादरलं! भाच्याने भरचौकात मामावर चाकूने केले वार, हल्ल्यात मामाचा दुर्दैवी अंत

राज ठाकरेंचं ट्विट जसंच्या तसं...

"एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण २०२१ ते २०२४ या काळात जवळपास ३०% नी वाढलं आहे. लहान मुलांना पळवून, नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत. आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही...

लहान मुलं पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप परत पाठवली जातात अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे. मुळात एनसीआरबी जे आकडे सांगत आहे ते आकडे म्हणजे किती पालकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत त्याचा तपशील सांगितला जातो, पण अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहचत तरी असतील का ? आणि समजा मुलं पुन्हा सोडवून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो, त्याचं काय ? मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजेरोसपणे काम कशी करते ?

यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही ? आज आपण रस्त्यावर, स्टेशनवर, बसस्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो, ती कोण आहेत ? त्यांच्या सोबतचे जी माणसं भीक मागत असतात ते खरंच त्यांचे आई-वडील असतात का ? याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी डीएनए टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाही ?

आज या राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत , यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखाने काही पाऊलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का ? हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय इतकंच प्रयोजन आहे का ? अधिवेशनात अनेकदा उत्तरं द्यायला मंत्री सभागृहात नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली अशा विषयावर विधिमंडळात चर्चा होईल अशी अपेक्षा करणं पण अवाजवी वाटेल अशी परिस्थिती आहे. पण महाराष्ट्राची ही अपेक्षा आहे. खरंतर केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृतिगट तयार करायला हवा, पण सध्या वंदे मातरम वर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही !

हे ही वाचा : Inside Story: अमित शाहांनी एका Meeting मध्ये फिरवला सगळा गेम, शिंदेंना पुन्हा केलं आपलंसं अन् रवींद्र चव्हाणांना दिला ‘तो’ आदेश!

असो. आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने तुम्ही लक्ष घालून, फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणून नव्हे तर काहीतरी ठोस कृती करावी ही महाराष्ट्राची तुमच्याकडून अपेक्षा आहे", असं ट्विट राज ठाकरेंनी केलं आहे.

    follow whatsapp