Sharad Pawar : “भाजपला अनुकूल…”, निवडणूक निकालांचा पवारांनी सांगितला अर्थ

भागवत हिरेकर

03 Dec 2023 (अपडेटेड: 03 Dec 2023, 10:52 AM)

Assembly Election Results 2023 Updates in Marathi : चार राज्यातील विधानसभा निवडणूक निकालावर शरद पवारांनी भाष्य केले. त्यांनी या निकालाचा अर्थ सांगताना महाराष्ट्रात वेगळा कल दिसेल, असे म्हटले आहे.

Sharad Pawar Reaction on Assembly election results 2023

Sharad Pawar Reaction on Assembly election results 2023

follow google news

Sharad Pawar on Assembly election Results 2023 : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल रविवारी (3 डिसेंबर) जाहीर झाले. चारपैकी तीन राज्यात भाजपने गुलाल उधळला. या निकालाचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी चार राज्यांच्या निकालावर भाष्य केले आहे.

हे वाचलं का?

सातारा येथे माध्यमांशी शरद पवारांनी संवाद साधला. चार राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालावर शरद पवार म्हणाले, “साधारणतः याच्यापेक्षा वेगळा निकाल लागेल, अशी माहिती आमच्याकडे नव्हती. त्याची दोन-तीन कारणे आहेत. एक तर असे आहे की, दोन ठिकाणी भाजपचे राज्य होते आणि तिथेच भाजपने अधिक लक्ष्य केंद्रीत केले होते. मुख्यतः राजस्थानचा प्रश्न होता, पण तिथे काँग्रेस पाच वर्षे सत्तेवर होती. पाच वर्षे सत्तेवर राहिल्यानंतर नव्या लोकांना संधी द्यावी, असा मूड राजस्थानचा होता. त्याला साजेसा असा निकाल आता दिसतोय.”

तेलंगणातील निकालाबद्दल पवार काय बोलले?

“तेलंगणामध्ये पहिल्यापासून एक असे चित्र दिसत होते की, ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्यात हातात ते राज्य राहिल. पण, राहुल गांधींची एक जाहीरसभा हैदराबादला झाली. त्याची उपस्थिती पाहिल्यानंतर आम्हा लोकांची खात्री झाली की, इथे परिवर्तन होईल. तसे तिथे आता दिसतंय. एक गोष्ट मान्य केली पाहिजे की यामध्ये भाजपच्या अनुकूल असा ट्रेंड दिसतोय”, असे महत्त्वाचे निरीक्षण शरद पवारांनी नोंदवले.

हेही वाचा >> शिवराज सिंह चौहान नाही, तर कोण होणार मुख्यमंत्री? 5 नावे स्पर्धेत

“इंडिया आघाडीची बैठक ६ डिसेंबरला मल्लिकार्जून खरगे यांच्या घरी बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत निवडणूक निकालावर आम्ही चर्चा करू. त्या राज्यातील जाणकरांकडून आम्हाला माहिती घ्यायची आहे. त्यानंतर आमची सामूहिक भूमिका आम्ही मांडू”, अशी माहिती यावेळी शरद पवारांनी दिली.

हेही वाचा >> ‘मलाही आशा-आकांक्षा आहेत, पण…’, ज्योतिरादित्य शिंदे असं म्हणाले अन्…

लोकसभा निवडणुकीवर परिणाम होईल का?

शरद पवार म्हणाले, “मला वाटत नाही. महाराष्ट्रावर माझा पूर्ण विश्वास आहे की, भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना स्थान नाही. इथे लोकांमध्ये परिवर्तन करण्याचा मूड आहे. हे माझे निरीक्षण या राज्यासाठीचे आहे. कारण मी इथे बघतोय, इतर राज्यात मी गेलो नाहीये”, असे सांगत पवारांनी महाराष्ट्रात परिणाम दिसणार नाही, असा दावा केला आहे.

    follow whatsapp