मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. शिवसेना (UBT) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप करत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत संजय शिरसाट एका खोलीत बनियनवर बसलेले दिसत आहे. यावेळी ते बेडवर बसून सिगारेट ओढत आहेत. तर त्यांच्या शेजारी पैशांनी भरलेली बॅग असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. या व्हिडिओने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
व्हिडिओ आणि संजय राऊत यांचे आरोप
संजय राऊत यांनी आज (11 जुलै) सकाळी ट्विटरवर (X) हा व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना उद्देशून प्रश्न उपस्थित केले. राऊत यांनी ट्विटमध्ये लिहिले, "हा रोमांचक व्हिडिओ आदरणीय पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पाहावा! देशात नक्की काय चाललंय? (महाराष्ट्रातील मंत्र्यांचा हा व्हिडिओ बरंच काही सांगतो)."
हे ही वाचा>> 'श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस', शिरसाट बोलून गेले... अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला.. तुम्हाला क्रोनोलॉजी समजली का?
त्यांनी पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधत, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मला दया येते! स्वतःच्या अब्रूचे आणखी किती धिंडवडे ते फक्त पाहात बसणार आहेत? हतबलतेचे दुसरे नाव फडणवीस!," असं म्हटलं आहे. राऊत यांनी या व्हिडिओद्वारे शिंदे गटावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले असून, यामुळे महायुती सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
'त्या' Video मध्ये नेमकं आहे तरी काय?
या 34 सेकंदांच्या व्हिडिओत शिरसाट एका बेडवर सिगारेट ओढत फोनवर बोलताना दिसत आहेत. त्यांच्या शेजारील बॅगेत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.
संजय शिरसाट यांचे स्पष्टीकरण
या व्हिडिओवर संजय शिरसाट यांनी तातडीने प्रतिक्रिया देत आपली बाजू मांडली आहे. त्यांनी दावा केला की, व्हिडिओतील बॅगेत पैसे नसून त्यांच्या वैयक्तिक वस्तू आणि कपडे होते. "ते माझं घर आहे, ती माझी बॅग आहे, आणि त्यात माझे कपडे होते," असं स्पष्टीकरण देत शिरसाट यांनी राऊतांच्या आरोपांचे खंडन केले आहे.
हे ही वाचा>> 'शाहांचे पाय धुतले अन् सांगितलं आता तुम्ही मला..', शिंदेंची दिल्ली वारी अन् संजय राऊतांनी खळबळच उडवली!
हा व्हिडिओ जुन्या काळातील असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच, या प्रकरणाचा राजकीय उपयोग करून आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राजकीय प्रतिक्रिया
या व्हिडिओनंतर मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेवर (शिंदे गट) टीका केली. त्यांनी ट्विटरवर लिहिले, ‘चड्डी-बनियान गॅंग’चे कारनामे हे त्या गॅंगचा म्होरक्या असलेल्या ‘खोक्या भाई’ला अडचणीत आणण्यासाठी कोणीतरी जाणूनबुजून तर बाहेर काढत नाही ना ? की ‘डार्लींग’ साठी ‘मुन्नी’ नाहक बदनाम होत आहे ?
#भ्रष्टाचार #खोके.. असं ट्वीट करत राजू पाटलांनी शिंदे गटावर पुन्हा निशाणा साधला आहे.
शिरसाटांनी सांगितलं आयकर खात्याची नोटीस आली आणि दुसऱ्याच दिवशी Video आला बाहेर!
दरम्यान, काल (10 जुलै) संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की, त्यांना आयकर खात्याची नोटीस आली आहे. तसंच एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनाही आयकर खात्याची नोटीस आली आहे. पण काही वेळातच त्यांनी आपल्या विधानावरून घुमजाव केलं. श्रीकांत शिंदेंना नोटीस आली हे वाक्य माझ्या तोंडी घालण्यात आलं असा दावा त्यांनी केला होता.
मात्र, संजय शिरसाट यांनी ज्या पद्धतीने विधान केलं होतं. त्यावरून महायुतीमध्ये काही आलबेल नसल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. दुसरीकडे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांनी तात्काळ दिल्ली दौरा केला. या दोन्ही गोष्टींमुळेच वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या.
अशावेळी लागलीच दुसऱ्या दिवशी संजय शिरसाट यांचा व्हिडिओ समोर आल्याने आता या सगळ्यामागे नेमकं काय राजकारण सुरू आहे असे सवाल उपस्थित केले जात आहेत.
महायुती सरकारवर परिणाम
दरम्यान, या प्रकरणाने महायुती सरकारमधील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा समोर आला आहे. संजय राऊत यांनी याचवेळी दावा केला आहे की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्याकडे फडणवीस यांच्याविरोधात तक्रार केली आहे. राऊत यांच्या मते, शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद हवे असून, त्यासाठी ते शिवसेना भाजपात विलीन करण्यास तयार आहेत. या दाव्यानेही राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
ADVERTISEMENT
