KDMC Shivsena UBT Corporators Missing : कल्याण-डोंबिवलीत राजकीय वातावरण तापलं आहे. ठाकरे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक अचानक नॉट-रिचेबल झाल्याने थेट पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी सत्ताधाऱ्यांवर संशय व्यक्त होत असून निष्पक्ष तपासाची मागणी करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून मी आयुष्यात कधीही जगणार नाही..', उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
पोलिस ठाण्यात लेखी तक्रार
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे 11 नगरसेवक निवडून आले असून त्यापैकी चार नगरसेवक सध्या नॉट-रिचेबल आहेत. यातील मधुर उमेश म्हात्रे आणि कीर्ती राजन डोणे हे दोन नगरसेवक 16 जानेवारीपासून संपर्काबाहेर असल्याने कल्याण पूर्व जिल्हाप्रमुख शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
'जिथे असाल तिथून माध्यमांसमोर या'
नगरसेवकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अपहरण, दबाव किंवा फसवणुकीचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्ससह तांत्रिक तपास करून तातडीने शोधमोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जिथे असाल तिथून माध्यमांसमोर या, असे आवाहन शरद पाटील यांनी केले आहे.
हे ही वाचा : 'देशात हिंदू राजकीय शक्ती बनेल हे भाजपला माहिती नव्हतं', बाळासाहेबांमुळेच... राज ठाकरे यांनी सांगितला 'तो' किस्सा
नगरसेवकांना सत्ताधाऱ्यांनी पळवले
ठाकरे गटाचे कल्याण पूर्व जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी याप्रकरणी मिसिंग तक्रार दाखल केली आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले की, कल्याण-डोंबिवली मनपामध्ये ठाकरे गटाचे ११ नगरसेवक निवडून आले. यामधील चार नगरसेवक नॉट रिचेबल झाले आहेत. आमच्या पक्षाचे नॉट रिचेबल झालेल्या नगरसेवकांची चौकशी करणे, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी करणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे. सत्ताधाऱ्यांनी त्यांना पळवलेलं आहे. आमच्या चिन्हावर निवडून यायचं आणि जनतेशी प्रतारणा करणं हे कोणालाच आवडलेलं नाही. यामुळे अविश्वासाचं वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या मिसिंगची तक्रार आम्ही दाखल केली आहे. त्या नगरसेवकांच्या जीवाला धोका आहे की त्यांचं अपहरण झालंय हे आम्हालाही कळालेलं नाही आणि जनतेलाही कळालेलं नाही. काल घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही मिसिंगची तक्रार दाखल करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार आम्ही मिसिंगची तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठांशी चर्चा करुन पुढील कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलेलं आहे.
ADVERTISEMENT











