Shivsena Thackeray group corporator Sarita Mhaske : मुंबई महापालिकेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या ‘नॉट रिचेबल’ असलेल्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के तब्बल 24 तासांच्या राजकीय नाट्यानंतर अखेर समोर आल्या आहेत. सरिता म्हस्के दिवसभर नॉट रिचेबल असल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. मात्र, आता सरिता म्हस्के यांनी स्वतः समोर येत या सर्व चर्चांवर पडदा टाकलाय.
ADVERTISEMENT
डॉ. सरिता म्हस्के या अवघ्या पाच दिवसांपूर्वी प्रभाग क्रमांक 157 मधून शिवसेना (ठाकरे गट)च्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. निवडणुकीनंतर काही दिवसांतच त्या संपर्कात येत नसल्याने आणि गट नोंदणीसाठी नवी मुंबई येथे झालेल्या बैठकीस त्या गैरहजर राहिल्याने पक्षांतराच्या चर्चांना उधाण आलं होतं. सरिता म्हस्के या शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. त्यामुळे या चर्चांना अधिकच बळ मिळालं.
मिलिंद नार्वेकरांच्या प्रयत्नांना यश
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विश्वासू नेते आणि विधानपरिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मध्यरात्री विशेष प्रयत्न करत सरिता म्हस्के आणि त्यांच्या पतीशी संपर्क साधला. अखेर 24 तासांनंतर त्या सरिता म्हस्के समोर आल्या असून, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना रात्री मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलं.
सरिता म्हस्के पहिली प्रतिक्रिया देताना म्हणाल्या..
दरम्यान, समोर आल्यानंतर सरिता म्हस्के यांनी पहिली प्रतिक्रिया देताना पक्षांतराच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. “हा सगळा प्रकार गैरसमजातून घडला. मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते, आहे आणि कायम राहीन,” अशी भूमिका त्यांनी बोलून दाखवलीये. आपण कोणत्याही परिस्थितीत ठाकरे गट सोडण्याचा विचार केला नव्हता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सरिता म्हस्के यांची आज सकाळी (दि.22) उद्धव ठाकरे यांच्याशी ‘मातोश्री’वर महत्त्वाची भेट होणार आहे. त्यानंतर बेलापूर येथील कोकण भवनात ठाकरे गटाची गटनोंदणीची औपचारिक प्रक्रिया त्या पूर्ण करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, यापूर्वी त्यांच्या अनुपस्थितीमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून डॉ. सरिता म्हस्के यांना अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या या स्पष्ट भूमिकेनंतर पुढे काय निर्णय घेतला जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











