सोलापूर : महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचं शहर असलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान पार पडणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. दरम्यान निवडणूक व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारीला वेग आला आहे. दीर्घकाळ प्रशासक राजवटीखाली असलेल्या महापालिकेत पुन्हा लोकनियुक्त प्रतिनिधींचं सरकार येणार असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.
ADVERTISEMENT
दीडशे वर्षांचा गौरवशाली इतिहास
सोलापूर महानगरपालिका ही केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतातील सर्वात जुन्या नागरी संस्थांपैकी एक मानली जाते. 1860 साली नगरपालिकेच्या स्वरूपात स्थापन झालेल्या या संस्थेला 1963 मध्ये महानगरपालिकेचा दर्जा मिळाला. प्राचीन इतिहास, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि औद्योगिक विकास यामुळे सोलापूरचं वेगळं स्थान आहे.
प्रभागरचना: 102 नगरसेवक, 26 प्रभाग
राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार सोलापूर महानगरपालिकेची प्रभागरचना निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 102 नगरसेवक निवडले जाणार असून, महापालिका क्षेत्र 26 प्रभागांमध्ये विभागण्यात आलं आहे.
चार सदस्यीय प्रभाग: 24
तीन सदस्यीय प्रभाग: 2
एकूण प्रभाग: 26
ही रचना आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी लागू राहणार आहे.
आरक्षणाचं गणित
महापालिकेतील 102 जागांपैकी महिलांसाठी 50 टक्के म्हणजेच 51 जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. विविध प्रवर्गांनुसार आरक्षण पुढीलप्रमाणे आहे
अनुसूचित जाती: 15 जागा (8 महिला)
अनुसूचित जमाती: 2 जागा (1 महिला)
नागरिकांचा मागासवर्ग: 27 जागा (14 महिला)
सर्वसाधारण: 58 जागा (28 महिला)
या आरक्षणामुळे सर्व जाती-धर्मातील लोकांना नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. आणि महिला प्रतिनिधित्वाला बळ मिळणार आहे.
2017 च्या सोलापूर महापालिका निवडणुकीत काय झालं होतं?
2017 मध्ये झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 102 जागांसाठी मतदान झालं होतं. या निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा जिंकत 49 नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष ठरला. शिवसेनेने 21 जागांवर विजय मिळवला, तर काँग्रेसला केवळ 11 जागांवर समाधान मानावं लागलं. याशिवाय एमआयएमने 9 जागा पटकावल्या, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाने प्रत्येकी 4 जागा जिंकल्या, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला एकच जागा मिळाली. काँग्रेसची कामगिरी इतकी कमकुवत ठरली की विरोधी पक्षनेतेपदही तिला मिळू शकलं नाही आणि ते पद शिवसेनेकडे गेलं. या निवडणुकीनंतर सोलापूरच्या राजकारणातील समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलली. त्यामुळे 2017 ची महापालिका निवडणूक ही शहराच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा वळणबिंदू ठरल्याचं राजकीय निरीक्षकांकडून मानलं जात आहे.
पारदर्शक निवडणुकीचा प्रशासनाचा निर्धार
डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झालं आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक संनियंत्रण समितीची बैठक 18 डिसेंबर 2025 रोजी पार पडली. या बैठकीत आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी, निवडणूक खर्चावर नियंत्रण, आर्थिक बळाचा गैरवापर रोखणे आणि मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या प्रलोभनांवर कारवाई यावर सविस्तर चर्चा झाली. पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यावर विशेष भर देण्यात येईल, असं स्पष्ट केलं. रोख रक्कम, दारू, भेटवस्तू वाटप याबाबत कडक पावलं उचलली जाणार आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
बीड : 'तुझी भावजय नगरसेवक म्हणून कशी निवडून आली?' तरुणाने कोयता फिरवत माजवली दहशत VIDEO
ADVERTISEMENT











