Nashik Politics : आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मेगा भरती सुरु केली असून विरोधी पक्षांतील नेत्यांना आपल्याकडे वळवण्याची मोहीम सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. नाशिक महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते व माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ तसेच काँग्रेसचे नेते शाहू खैरे यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ADVERTISEMENT
मात्र, या संभाव्य पक्षप्रवेशामुळे भाजपच्या पक्षांतर्गत राजकारणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपच्या नेत्या आणि आमदार देवयानी फरांदे यांनी या प्रवेशाला तीव्र विरोध दर्शवला आहे. तरीही हे तिन्ही नेते भाजपच्या कार्यालयात दाखल झाले असून त्यांच्या प्रवेशाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. दुसरीकडे, नाशिकमधील भाजप कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक 13 मध्ये होणाऱ्या संभाव्य पक्षप्रवेशाला भाजपच्या स्थानिक पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांनी उघडपणे विरोध दर्शवला. नव्याने प्रवेश घेणाऱ्या नेत्यांना कार्यालयात प्रवेश देण्यात आलेला नसून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाजप कार्यकर्ते आणि प्रवेशासाठी आलेले नेते यांच्यामध्ये पोलिसांची साखळी उभी करण्यात आली आहे.
संजय राऊतांकडून दोन्ही नेत्यांची हकालपट्टी
दरम्यान, या घडामोडींवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावरून विनायक पांडे आणि यतीन वाघ यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती दिली. पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे आणि शिस्तभंग केल्याच्या कारणावरून उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचा ठाकरे गटाशी असलेला संबंध पूर्णतः तुटल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप शहराध्यक्ष सुनील केदार हे संबंधित नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांकडून ‘जय श्रीराम’च्या घोषणाबाजीसह नाराजी व्यक्त केली जात आहे. पक्षासाठी अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. बाहेरून आलेल्या नेत्यांना संधी देताना मूळ कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी मागणीही करण्यात येत आहे.
विनायक पांडे आणि यतीन वाघ काय म्हणाले?
दरम्यान, शाहू खैरे, विनायक पांडे आणि यतीन वाघ यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपमधील अंतर्गत नाराजीबाबत आम्हाला कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच आम्ही येथे आलो असून, त्यांनीच आम्हाला पक्षप्रवेशासाठी बोलावले असल्याचा दावा त्यांनी केला. भाजपमधील अंतर्गत मतभेद हा त्यांचा पक्षांतर्गत विषय असल्याचे सांगत, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या विकासासाठी आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत सहभागी होण्यासाठी आपण भाजपमध्ये येत असल्याचे या नेत्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण घडामोडींमुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, आगामी महापालिका निवडणुकीआधीच राजकीय वातावरण तापले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात प्रेयसीसह आईचा पेटवून घेण्याचा प्रयत्न, घटनेनं पुन्हा नांदेड हादरलं
ADVERTISEMENT











